मुंबई : “ठाकरे सरकारला केवळ आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील गोर गरिब पोरांची चिंता नाही. भाषणबाजीत केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचं. आज अनेक विद्यार्थी परीक्षेच्या, मुलाखतीच्या, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. हे सरकार नेमकं काय करतंय, वसूली करायला सांगण्यात व्यस्त आहे की काय?”, अशी तोफ भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी ठाकरे सरकारवर डागली. (BJP MLA Ram Satpute Criticized thackeray Goverment Over MPSC Swapnil Lonkar Suicide)
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Mansoon Session) सुरु होत आहे. विरोधी पक्ष भाजप सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्यास सज्ज झाला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा असलेल्या एमपीएससी परीक्षेवरुन भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राम सातपुते विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी करणाऱ्या पुण्यातल्या स्वप्निलच्या आत्महत्येला हे सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे.
“हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. वाझेसारख्या अधिकाऱ्यांना वसूलीचे आदेश देण्यात गुंग आहे. या सरकारला आदित्य ठाकरे, पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. आपली पोरं आमदार, खासदार मंत्री कशी होतील, याची या सरकारमधील मंत्र्यांना चिंता आहे. गोरगरिब पोरांचं या सरकारला काहीही देणंघेणं नाहीय. पण सरकारमधील मंत्र्यांनी जर स्वप्निलच्या आईचा आक्रोश ऐकला तर त्यांना समजेल गोरगरिब पोराबाळांचं दु:ख काय आहे… ‘केम छो वरळी…’ म्हणणं सोपंय, पण या लेकरांशी बोलणार कोण? पोरांच्या हिताचे निर्णय घेणार कोण?” अशा प्रश्नांच्या भडीमारासह आमदार सातपुते यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
“आज कित्येक मुलं परीक्षेची वाट बघत आहेत. ज्यांची परीक्षा झाली आहे ते मुलाखतीची वाट बघत आहेत. ज्यांची मुलाखत झालीय ते नियुक्तीची वाट बघत आहे. मग हे सरकार अशा काळात काय करतंय. वाझेसारख्या अधिकाऱ्याला वसूली करण्याचे आदेश देण्यात व्यस्त आहे की काय….?, सरकारच्या तोंडावर एमपीएससीची पुस्तकं फेकून मारतो म्हणजे त्यांना कळेल, गोरगरिबांच्या एमपीएससी करणाऱ्या पोरांचं दु:ख काय आहे”, असं राम सातपुते म्हणाले.
(BJP MLA Ram Satpute Criticized thackeray Goverment Over MPSC Swapnil Lonkar Suicide)
हे ही वाचा :