नवी दिल्ली : भाजपचे नेते विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असा संघर्ष आता पुन्हा पेटू लागला आहे. भाजप आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर (Major allegation on Maharashtra CM Uddhav Thackeray) आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिल्याचं रवी राणा (BJP MLA Ravi Rana) यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांच्या मदतीनं दबावतंत्र महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) वापरलं जात असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या, पण 307 म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, यातून नेमकं काय प्रतीत होत असा प्रश्न रवी राणा यांनी उपस्थित केलाय.
संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.
महिला बालकल्याणचा घोटाळा काढला, स्मृती इराणींनी आदेश देऊन चौकशी लावली, या सगळ्यामुळे द्वेषाच्या भावनेने हे सगळं सुरु आहे, पालकमंत्रीही पोलिसांवर दबाव टाकत आहे. महाराष्ट्रात मी लवकरच जाईल, मी माहिती घेत आहे, 80-80 वर्षांच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांना अटक केली, पोलीस किचनपर्यंत जाऊन अटक करत आहेत, मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांच्या इशाऱ्याने हे सगळं सुरु आहे, असा आरोप रवी राणा यांनी म्हटलं. राणेप्रमाणेच राणांनाही अकडवण्यासाठीचे सगळे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहेत.
नवनीत राणांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण घाबरणार नाही, आम्ही दोघेही जेलमध्ये जायला तयार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी सातत्यानं केला.
छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीतील (Amravati) राजकारण चांगलंच तापलंय. शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून निषेध नोंदवल्याचा आरोप झाला होता. बुधवारी दुपारी आष्टीकरांसमोर महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पुतळा का हटवला, याचा जाब विचारत त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली होती. त्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर आता रवी राणा यांनी मविआ सरकारवर गंभीर आरोप केलेत.
अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाईफेक केल्या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.