भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, पुण्यात अर्धा तास चर्चा
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर थोड्याशा थांबलेल्या भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या की काय असा प्रश्न पडणारं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
पुणे : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर थोड्याशा थांबलेल्या भेटीगाठी पुन्हा सुरु झाल्या की काय असा प्रश्न पडणारं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कारण भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad meets Ajit pawar) यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. भाजपचा बडा नेता पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीला (Prasad Lad meets Ajit pawar) आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
प्रसाद लाड यांनी अजित पवारांची भेट नेमकी का घेतली, याबाबतचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अजित पवार आज पुण्यातील सर्वच विषयांवर सकाळपासून बैठका घेत आहेत. यावेळी प्रसाद लाड हे सुद्धा पुण्यात येऊन त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. प्रसाद लाड आणि अजित पवार यांची सर्किट हाऊस इथं भेट झाली. या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.
या भेटीनंतर बाहेर आलेल्या प्रसाद लाड यांना माध्यमांनी भेटीबाबत विचारलं असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
अजित पवार आणि भाजप नेत्यांची भेट हा राजकीय वर्तुळातील नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भल्या पहाटे शपथ झाल्यानंतर, राजकीय वर्तुळात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच जेव्हा जेव्हा अजित पवारांना भाजप नेते भेटतील, तेव्हा तेव्हा या शपथविधीची चर्चा होईल.
अजित पवारांच्या आवाहनानंतर भाजपची माघार
दरम्यान, एकीकडे ही भेट होत असताना, तिकडे बीड विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली. कारण संख्याबळाअभावी भाजपने माघार घेतली. त्याआधी अजित पवारांनी भाजपला माघार घेण्याचंही आवाहन केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली. बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले.
संबंधित बातम्या