पंढरपूर : कोरोनामुक्त झालेले भाजपचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. पंढरपूरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पडळकरांवर 100 पोती भरुन फुले उधळली. (BJP MLC Vidhan Parishad Gopichand Padalkar showered flowers from JCB)
आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (शनिवार 12 सप्टेंबर) हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यानंतर शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीमधून फुले उधळली. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला.
गोपीचंद पडळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशीच समोर आला होता. त्यानंतर पडळकर यांनी पंढरपुरात येऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली.
पडळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पडळकर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पंढरपुरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. यावेळी आनंद झालेल्या समर्थकांनी थेट जेसीबीमधून फुलांचा वर्षाव पडळकर यांच्यावर केला.
माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के, संजय माने या समर्थकांनी गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा फुलांचा वर्षाव केला.
पहा व्हिडीओ :
(BJP MLC Vidhan Parishad Gopichand Padalkar showered flowers from JCB)
कोण आहेत गोपीचंद पडळकर?
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर पडळकर यांच्याविरोधात संतापाची लाट उमटली होती. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर जून महिन्यात म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर
(BJP MLC Vidhan Parishad Gopichand Padalkar showered flowers from JCB )