मुंबई : स्थलांतरित नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्यास मदत करणारा अभिनेता सोनू सूदच्या कामगिरीवर ‘सामना’तून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर भाजप-मनसेसह काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले आहेत. (BJP MNS answers Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok on Sonu Sood helping migrants go home)
“संकट काळात सोनू सूद यांनी परप्रांतीय मजुरांना उदारपणे मदत करुन विलक्षण कामगिरी केली. मोठ्या मनाने त्याचा सन्मान करण्याऐवजी शिवसेना त्याच्यावर टीका करत आहेत. शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे. मजुरांना मूळगावी परत पाठवण्याची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयशी लपवण्यासाठी त्यांनी या पातळीवर जाऊ नये” अशी टीका सत्तेत सहभागी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केली आहे. निरुपम यांनी याआधी अनेक वेळा शिवसेनेशी आघाडी करण्यावरुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
Sonu Sood did extraordinary work during the crisis by helping migrant workers generously.
Instead of honouring him with a big heart, #Shivsena is criticising him.
Shivsena is a ruling party. It should not stoop to this level to hide it’s failure in handling migrants’ crisis.— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 7, 2020
‘कोरोना’वरुन लक्ष हटवण्यासाठी राजकीय आरोप होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसंच राऊत यांच्या बोलण्याला गांभीर्याने न घेण्याची टीका दरेकरांनी केली. भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांना ‘हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?’ असा सवाल केला. राज्य सरकारने करायचं काम सोनू सूद यांनी केल्याचं राम कदम म्हणाले.
1/1 स्वतःही करायचं नाही @SonuSood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका ? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?
— Ram Kadam (@ramkadam) June 7, 2020
“मा. संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? ज्याने काम केलंय, त्याचं कौतुक करुया… मनाचा मोठेपणा दाखवुया… असो ‘रडण्या’पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार…” अशी बोचरी टीका मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे.
मा. संजय राऊत,
या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत?
ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया…
मनाचा मोठेपणा दाखवुया…
असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार… #बसारडत— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 7, 2020
पहा व्हिडिओ :
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?
“लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते ? सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यांत पोहोचवले. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी काहीच केले नाही. या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद यास शाबासकी दिली.
हेही वाचा : सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न, ‘सामना’तून सोनूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.
सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, ‘बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.
मजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय ?
सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो ? या सर्व यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. तर हा फक्त चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे.
सोनू सूदला महाराष्ट्राच्या राजभवनावर खास बोलवून घेतले व तो करत असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. सोनू सूद राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटला व स्थलांतरीत मजुरांची वेदना मांडली. त्यावर राज्यपालही भावनाविवश झाले. राज्यपालांनी सोनूला आशीर्वाद दिला व म्हणाले, “सोनूजी आप महान कार्य कर रहे है, इसकी जितनी सरहाना की जाए, कम है. राजभवनातून तुला हवी ती मदत मिळेल.” महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी तीन महिन्यांत जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबई पालिका व इतर सामाजिक संस्था करीत आहेत. त्या सगळ्यांची यादी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राजभवन प्रशासनाकडे पाठवायला हवी.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज कोरोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही आपल्या राज्यात घ्यायला तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कुठे ? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झाली कशी ? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते मिळत होते. सोनू सूद या महात्माचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील.
इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल !
सोनू सूदवरील टीकेवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
संबंधित बातम्या :
सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप
(BJP MNS answers Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok on Sonu Sood helping migrants go home)