Gopal Shetty: भाजपचा नगरसेवक, बोरिवलीचा ‘उद्यान सम्राट’ ते खासदार; कोण आहेत गोपाळ शेट्टी?
पोयसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक उद्यानं आणि मैदानं विकसित केली. त्यामुळेच त्यांना बोरिवलीकरांनी ‘उद्यान सम्राट’ उपाधी दिली. | MP Gopal Shetty BJP

मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यात खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भाजपचा मंडल सचिव, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा रंजक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून उत्तर मुंबई मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केली आहे. 2014 मध्ये ते महाराष्ट्राताली सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे खासदार ठरले होते. (BJP MP Gopal Shetty political journey)
कोण आहेत गोपाळ शेट्टी?
गोपाळ चिन्नया शेट्टी हे मुंबईतील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. 31 जानेवारी 1954 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. नॉन मॅट्रिक असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी 35 वर्ष साईनाथ इंजिनीयरिंग वर्क्सच्या माध्यमातून टर्नर फिटर वेल्डरचा व्यवसाय केला. मात्र, नंतरच्या काळात जनसंपर्क आणि चांगल्या कामगिरीच्या बळावर ते भाजपमध्ये एकएक पायरी चढत वर गेले.
गोपाळ शेट्टी यांचा राजकीय प्रवास
गोपाळ शेट्टी हे 1992 साली नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. बोरिवली परिसरात नगरसेवक ते आमदार म्हणून त्यांनी अनेक विकासकामे केली. मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभ्या राहू न देता, तिथे मैदानं आणि उद्यानं तयार केली. पोयसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक उद्यानं आणि मैदानं विकसित केली. त्यामुळेच त्यांना बोरिवलीकरांनी ‘उद्यान सम्राट’ उपाधी दिली.
सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला खासदार
त्यानंतर 2014 मध्ये भाजपने त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले. त्यावेळी मोदी लाटेच्या प्रवाहात गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांच्यासारख्या कसलेल्या आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या नेत्याचा 4 लाख 56 हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत गोपाळ शेट्टी हे राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरले होते.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा पराभव
तर 2019 साली अभिनेत्री काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरवून गोपाळ शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. उर्मिला मातोंडकर यांच्या झंझावती प्रचारामुळे उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीला रंगतही आली होती. मात्र, या निवडणुकीत तब्बल 4 लाख 65 हजार 247 चे मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते.
संबंधित बातम्या:
Gopal Shetty | मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा, खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात ‘नको!’
(BJP MP Gopal Shetty political journey)