चिल्लर जमा करुन रुपया होत नाही, खासदार निंबाळकरांचं शरद पवारांच्या बैठकीवर टीकास्त्र
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची.
पुणे : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (BJP MP Ranjeetsingh Nimbalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीवर हल्लाबोल केला. चिल्लर जमा करून रुपया करता येत नाही, अशा शब्दात खासदार निंबाळकरांनी दिल्लीतल्या बैठकीवरून टोला लगावला. शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रमंचच्या (Rashtra Manch) बॅनरखाली विविध पक्षाचे नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक, गीतकार अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची बैठक बोलावली आहे. त्यावरुन भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी हल्लाबोल केला. (BJP MP Ranjeetsingh Nimbalkar attacks on Sharad Pawar and Rashtra Manch meeting at Delhi)
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची. या सर्व पक्षांचे अस्तित्व संपलं आहे ते आता एकत्र येत आहेत. असे अनेक अयशस्वी प्रयोग झाले आहेत. मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करत आहेत”
ईडीच्या भीतीने येडी बाहेर
ईडी मागे लागते अशी दिशाभूल करणारे येडी सध्या बाहेर फिरत आहेत. अपरिपक्व लोकं सध्या मीडियावर येऊन रोज बोलतात, त्यांचा तात्पुरता स्वार्थ आणि भविष्यातील नुकसान युती तुटल्यामुळे झालं, असं म्हणत खासदार निंबाळकरांनी संजय राऊतांना टोला लगावला.
शिवसेनेच्या कृपेमुळे चोर लोकं सत्तेवर आलीत, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला.
शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. राष्ट्रमंचच्या (Rashtra Manch) बॅनरखाली शरद पवारांच्या दिल्लीतील घरी दुपारी चारच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक राष्ट्रमंचची आहे, तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला दिग्गज नेते उपस्थित आहेत.
शरद पवार यांच्या घरी ओमर अब्दुल्ला दाखल. यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे सुशिल गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपा कडून घनश्याम तिवारी, जावेद अख्तर, पवन वर्मा, के सी सिंग, माजीद मेमन, वंदना चव्हाण, जस्टीस ए पी शाह उपस्थित होते.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढ्याचे खासदार आहेत.
त्यांनी जुलै 2019 मध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद भूषविले होते.
सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं मात्र दोनच महिन्यांनी भाजपमध्ये प्रवेश
माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी दोघांची लढत झाली होती. त्यात निंबाळकरांनी बाजी मारली
राष्ट्रवादीने माढ्याची लढत प्रतिष्ठेची केली होती. पण अगोदर मोहिते पाटील घराणं आणि यानंतर फलटणमधील निंबाळकर घराणं भाजपाच्या बाजूने असल्यामुळे आणखी चुरस निर्माण झाली होती.
संबंधित बातम्या
LIVE : शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीकडे देशाचं लक्ष