सिंधुदुर्ग ZP अध्यक्ष निवडणूक : राणे पितापुत्र तळ ठोकून, शिवसेनेवर सदस्य फोडाफोडीचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला (Narayan Rane Sindhudurg ZP President Election)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पदासाठी आज होणाऱ्या निवडीवरुन जिल्ह्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या फोडाफोडीवरुन आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. खुद्द भाजप खासदार नारायण राणे दिल्लीतील संसदेचं अधिवेशन सोडून सिंधुदुर्गात ठाण मांडून आहेत. (BJP Narayan Rane accuse on Shivsena Satish Sawant in Sindhudurg ZP President Election)
सतिश सावंतांवर फोडाफोडीचा आरोप
भाजपकडे पुरेस संख्याबळ असलं तरी काही सदस्य शिवसेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही सगळी परीस्थिती हाताळण्यासाठी नारायण राणे आणि नितेश राणे हे सिंधुदुर्गात तळ ठोकून आहेत. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते सतिश सावंत यांच्यावर सदस्य फोडीवरुन गंभीर आरोप केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा हस्तक्षेप : नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला. यासंदर्भात बँकेचे कर्ज घेतलेल्या काही जिल्हा परिषद सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून आपल्यावर जप्ती येऊ नये यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांना येऊन भेटा अशी धमकी देत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.
भाजपच्या सदस्यांना फोन करुन तुमचं कर्ज आम्ही जप्त करणार नाही, तुम्ही आम्हाला येऊन भेटा, तुम्हाला प्रत्येकी पंचवीस लाख देतो, असं सतिश सावंत फोन करून सांगत असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला. जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझेंबरोबर जेलमधे पाठवण्याचा इशाराही राणेंनी दिला.
राणेंचं राजकीय वजन घटलं : सतिश सावंत
दरम्यान, “नारायण राणे यांचं राजकीय वजन कमी झालं आहे, त्यामुळे अधिवेशन सोडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवर त्यांना लक्ष केंद्रित करावं लागलं, राणेंनी जे पेरलं तेच आता उगवत आहे” असा पलटवार सतिश सावंत यांनी केला. पत्रकार परिषदा घेऊन बेछूट आरोप करण्याचा छंद नारायण राणेंना जडला असल्याची टीकाही सतिश सावंत यांनी केली आहे.
1990 पासून आतापर्यंत राणेंच्या एका फॅक्सवर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड होत होती. मात्र आता परिस्थिती बदलली. राणे पितापुत्रांना आपले सदस्य फूटू नयेत म्हणून जिल्ह्यात ठाण मांडावं लागलं. तसेच या सदस्यांना रुग्ण ठेवतात तसं आपल्या पडवे येथील हॉस्पिटलमध्ये गेले चार दिवस नजरकैदेत ठेवण्याची वेळ आल्याची टीकाही सतिश सावंत यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
सिंधुदुर्ग ZP : भाजपचे 31, शिवसेनेचे 19; तरी राणेंना धक्का देत शिवसेनेचा अध्यक्ष बसणार?
(BJP Narayan Rane accuse on Shivsena Satish Sawant in Sindhudurg ZP President Election)