भाजपचे तरुण आमदार म्हणून निवडून आला आहात, भेटीला आलेल्या नितेश राणेंचं पंकजांकडून कौतुक
भाजपचे तरुण आमदार म्हणून निवडून आला आहात, अशा शब्दात पंकजांनी नितेश राणेंबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच नितेश राणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुंबई : भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Nitesh Rane meet Pankaja Munde) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी नितेश राणे (Nitesh Rane meet Pankaja Munde) यांचं कौतुक केलं. भाजपचे तरुण आमदार म्हणून निवडून आला आहात, अशा शब्दात पंकजांनी नितेश राणेंबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच नितेश राणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंकजा मुंडे या भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्यांनी राज्याचं महिला बाल कल्याण तसंच ग्रामविकास मंत्रीपद भूषवलं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
नितेश राणे यांचा विजय
विधानसभा निवडणुकीपूर्वी नितेश राणे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. त्यांनी कणकवलीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. भाजपची शिवसेनेसोबत युती असूनही शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. सेनेकडून सतीश सावंत हे नितेश राणेंविरोधात उभे होते. मात्र त्यांचा पराभव झाला.
पंकजा मुंडे यांचा पराभव
दुसरीकडे नितेश राणे यांनी ज्या पंकजा मुंडेंची भेट घेतली, त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. राज्याचं लक्ष लागेलल्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होती. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर मात केली.
एकीकडे शिवसेना-भाजपची सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु असताना, तिकडे पंकजा मुंडे यांनाही विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे. पंकजा मुंडे आणि राम शिंदे या दोन मंत्र्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र या दोघांनाही पुन्हा मंत्रिपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.