“माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची, मुख्यमंत्र्यांच्या संवादात लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीही नाही”
जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला. (Pravin Darekar On CM Uddhav Thackeray)
मुंबई : राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल जनतेला संबोधित करताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. (BJP Pravin Darekar Comment On CM Uddhav Thackeray Speech)
लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नाही
राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही 67 हजारांहून 24 हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील 15 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.
सर्व आवश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवता येतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.