अजित पवारांच्या त्या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद, पुणे-नाशकात भाजप आक्रमक!
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.
प्रदीप कापसे, चंदन पुजाधिकारीः (पुणे, नाशिक) : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji Maharaj) केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहे. पुणे आणि नाशिकमध्ये भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. नाशिकमध्ये भाजप समर्थकांनी अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तर पुण्यातही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. विशेष म्हणजे बारामतीत अजित पवार यांच्या घरासमोरही हे आंदोलन करण्यात आलं
पुण्यात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे, अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आंदोलनात सहभागी झाले.
छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर अजित पवारांविरोधात घोषणाबाजीही केली.
कुठे केलं वक्तव्य?
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
अजित पवारांना भाजपने घेरलं असताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलंय. तर आपल्या ट्विटमध्ये आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलंय.
संभाजीराजेंसारक्या शूरवीराला बदनाम करण्याचे प्रयत्न एका वर्गाकडून अनेक वेळा सुरु आहेत. पण सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कुणी यावर बोलेल का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नाजूक इतिहासात तुम्ही जाऊ नका, नाही तर खूप मोठा वाद निर्माण होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा
तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवून द्या, असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहित नाही, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे, असं वक्तव्य नरेंद्र पवार यांनी केलंय.