आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप
चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर आणण्यासाठी मेधा कुलकर्णी यांची जागा दिल्याने आपलं विधानपरिषदेवर पुनर्वसन होईल, अशी मेधा कुलकर्णी यांना आशा होती (BJP Pune Ex MLA Medha Kulkarni Cry as MLC Candidature Denied)
पुणे : विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्याने भाजपच्या पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोथरुड मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. (BJP Pune Ex MLA Medha Kulkarni Cry as MLC Candidature Denied)
“हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. माझं नेमकं काय चुकलं हे पक्षाने सांगावं. माझं काय चुकलं हे मला माहीत नाही, आता मला काही पुन्हा संधी दिसत नाही” असं सांगताना मेधा कुलकर्णी रडवेल्या झाल्या.
विधानसभेला चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या मीटिंगमध्ये मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं. मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी व्यक्त केली.
हेही वाचा : माझी पक्षावर निष्ठा, मला खंजीर खुपसला तरी चालेल, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी
यासंदर्भात चंद्रकांत पाटील-देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी चर्चा होत होती, आजही सर्व नेत्यांना मेसेज केले मात्र कोणाचाच रिप्लाय आला नाही, असं सांगताना कुलकर्णी यांना रडू कोसळले.
मला तिकीट दिलं नव्हतं. मी पडलेली नव्हते, तर आश्वासन देऊन मला थांबवलं होतं. मी पक्षाची पंचवीस वर्षापासून कार्यकर्ती आहे. पक्ष कुठेच नसताना मी निष्ठेनं काम केलेला आहे. वेगवेगळी प्रलोभने आली असतानाही मी पक्ष सोडला नाही. अत्यंत कठीण, वाईट परिस्थितीत पक्षाला मी विजय मिळवून दिला आहे, मला पक्षांवर दबाव आणता येत नाही, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे व्यक्त केली.
त्यावेळी विधानपरिषदेवर असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना विधानसभेवर आणण्यासाठी मेधा कुलकर्णी यांची जागा दिल्याने आपलं विधानपरिषदेवर पुनर्वसन होईल, अशी मेधा कुलकर्णी यांना आशा होती. आधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि आता मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केल्याने पक्षात नाराजांची फळी वाढण्याची चिन्हं आहेत,
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.
2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा : MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले
कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला होता. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही. भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही, तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला होता. मात्र मेधा कुलकर्णी यांनी स्वत: प्रचारात सहभाग घेऊन, चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. (BJP Pune Ex MLA Medha Kulkarni Cry as MLC Candidature Denied)
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचं ठरवलं आहे. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपचे उत्सुक चेहरे कोण होते?
पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसे म्हणाले होते.
VIDEO : खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील https://t.co/b3nSIz4uXZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 8, 2020
कोणत्या जागांसाठी निवडणूक
24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.
प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर
खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील
(BJP Pune Ex MLA Medha Kulkarni Cry as MLC Candidature Denied)