डॉ. लागूंसारखं ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ विचारुन मी फडणवीसांना भंडावून सोडलं : खडसे
भाजपातले असंतुष्ट नेते एकनाथ खडसेंनीही नेमका सिंहासन आणि सामना चित्रपटातील धागा पकडून आपली खदखद व्यक्त केली.
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती ही मराठीत प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ सिनेमासारखी असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ‘सामना’ सिनेमातल्या डॉ. श्रीराम लागूंसारखं मी त्यांना ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारुन भंडावून सोडल्याचंही खडसे म्हणाले (Eknath Khadse on Sinhasan).
विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे महानाट्य घडलंय ते एखाद्या चित्रपटातल्या नाट्यालाही लाजवेल असंच होतं. भाजपातले असंतुष्ट नेते एकनाथ खडसेंनीही नेमका हाच धागा पकडून आपली खदखद व्यक्त केली.
ज्येष्ठ संपादक आणि लेखक अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित, डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ सिनेमा पाहिला नसेल असा दर्दी प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सिनेमात रस असलेल्या प्रत्येकाने हा कल्ट सिनेमा पाहिलाच असेल. आता या सिनेमाचा उल्लेख होण्याचं कारण एकनाथ खडसेंनी या सिनेमाची आठवण केली. खडसेंना सिंहासन सिनेमा आठवायचं कारण म्हणजे या व्यासपीठावर खडसेंसोबत सिंहासन सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेलही होते.
एकनाथ खडसेंना पक्षात घेण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच?
सिंहासन सिनेमामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात बंड करुन मुख्यमंत्रीपद मिळवू पाहणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या फसलेल्या बंडाची कहाणी दाखवली आहे. अरुण साधूंच्या सिंहासन या कादंबरीवरुन हा सिनेमा बेतलेला असला तरी सिनेमातल्या घटना या साधू पत्रकारिता करत असलेल्या काळातल्या असल्याचं त्यांच्या कादंबरीत त्यांनी स्वतःच लिहिलंय. मग, प्रश्न आता हा आहे की, खडसेंना अभिप्रेत असलेले बंडाच्या भूमिकेतले नेते नेमके कोण आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली अंगार लावण्याच्या कोणत्या खटपटी ते करत असतील? याचं उत्तर कदाचित खडसेंकडेच असावं.
सामना सिनेमामध्ये पत्रकाराच्या भूमिकेतले डॉ. श्रीराम लागू हे ‘बेपत्ता झालेल्या मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारुन नेत्याच्या भूमिकेतल्या निळू फुलेंना बेजार करून सोडतात. सिनेमात डॉ लागूंना मारुती कांबळेचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मात्र, खडसेंना त्यांच्या मारूती कांबळेचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही हे काही त्यांनी त्यांच्या भाषणातून (Eknath Khadse on Sinhasan) सांगितलं नाहीच…