विरोधी पक्षनेतेपद हवे तर उपसभापतीपद द्या, सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसची कोंडी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे असेल, तर काँग्रेसने विधान परिषदेचे उपसभापती पद आम्हाला द्यावे, अशी मागणी भाजप-शिवसेनेने केली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे असेल, तर काँग्रेसने विधान परिषदेचे उपसभापती पद आम्हाला द्यावे, अशी मागणी भाजप-शिवसेनेने केली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप-शिवसेनेने ठेवलेल्या या अटीनंतर आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजप-शिवसेनेने आपली मागणी मान्य झाली तरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीला मान्यता देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विरोधीपक्ष नेते पदावर वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, असे पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले आहे. त्यावर यथावकाश निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्षांनी कळवले आहे.
उपसभापती पदाची निवडणुक झाल्यास विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये सदस्य संख्येत फक्त एकाचा फरक आहे. उपसभापती पद काँग्रेसला हवे आहे, पण मतांचे गणित जुळवण्याविषयी काँग्रेस साशंक आहे. उपसभापती पदाचा प्रस्ताव गेली दोन अधिवेशने रखडलेला आहे. शिवसेनेनं उपसभापती पदासाठी आग्रह धरला आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.