”माझं आडनाव आठवले, तरीही शिवसेना-भाजप मला विसरले”
कोल्हापूर : शिवसेना-भाजप यांच्या युतीमुळे अडचणीत आलेले आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली आहे. मी ‘आठवले’ असून युतीला माझा विसर पडलाय. दोन नाही, किमान एक तरी जागा सोडावी. शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा आम्हाला सोडावी. युतीने डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत आठवले […]
कोल्हापूर : शिवसेना-भाजप यांच्या युतीमुळे अडचणीत आलेले आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली आहे. मी ‘आठवले’ असून युतीला माझा विसर पडलाय. दोन नाही, किमान एक तरी जागा सोडावी. शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा आम्हाला सोडावी. युतीने डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.
कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या लोकसभा निवडणुकीतही मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देतील. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी मोदींना निवडून दिलं. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप सरकारवर नाही. मोदी फकीर आहेत. तेच पुन्हा पंतप्रधान होतील. जनतेसाठी त्यांनी विविध कामे केली. सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिलं, असंही रामदास आठवलेंनी सांगितलं.
केंद्र सरकारचं कौतुक करताना आठवलेंनी युतीवरही नाराजी व्यक्त केली. काहीही झालं तरी एनडीएची साथ सोडणार नाही, असं ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही ऑफर आहे. यूपीत बसपाला टक्कर द्यायची असेल तर आम्हाला जागा मिळायला हवी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. आम्हाला आमच्या बळावर एकही आमदार निवडून आणता येत नाही, म्हणून युती करावी लागते, अशी प्रतिक्रियाही आठवलेंनी दिली.
दरम्यान, भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पण सोलापुरातून प्रकाश आंबेडकर निवडून येतील असे वाटत नाही, असं आठवलेंनी म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीचा फायदा युतीलाच होणार आहे, असंही ते म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळीही लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. पण शरद पवार यांना महागठबंधनचे सरकार येणार नाही असं वाटलं असेल, म्हणून त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असावा. सरकार येणार नाही आणि स्वतः पंतप्रधान होणार नाही असं पवारांना वाटलं असेल, असा टोला आठवलेंनी लगावला.