Goa politics : गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ फसलं? भाजपाच्या वाटेवर असलेले पाच आमदार विधानसभेत दाखल
काँग्रेसचे (Congress) जे आमदार भाजपाच्या संपर्कात होते, ते पुन्हा परतल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. हे पाचही आमदार आज अधिवेशनासाठी विधानसभेत हजर होते.
पणजी : महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर गोव्यात (Goa) देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत होते. गोव्यात भाजप (BJP) ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र गोव्यातील काँग्रेसचे (Congress) जे पाच आमदार भाजपाच्या संपर्कात होते, ते आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थित असल्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो आणि दिगंबर कामत हे काँग्रेसचे पाच आमदार भाजपाच्या संपर्कात होते. ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता हे आमदार अधिवेशनाला उपस्थित असल्याने गोव्यात आमदारांचे बंड थंड पडले आहे. मात्र दुसरीकडे या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने मायकल लोबो यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हाकालपट्टी केली आहे.
काँग्रेसची सावध पाऊले
आपले काही आमदार बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजताच काँग्रेसकडून सावध पाऊले उचलण्यात आल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसने रविवारी मध्यरात्री हे पाच आमदार सोडून आपल्या इतर आमदारांना अज्ञातस्थळी हलवले होते. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसने विरोधी पक्षनेता मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली. सोनिया गांधी यांनी मुकुल वासनिक यांना या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पाठवले असून, ते आज सकाळीच गोव्यात दाखल झाले आहेत. मात्र आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनला काँग्रेसचे सर्व आमदार हजर असल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजपाकडून आमदारांना ऑफर?
बंडखोरी करू पहाणाऱ्या आमदाराच्या गटाला आणखी तीन आमदारांची गरज होती. म्हणजे ही आमदारांची संख्या आठवर पोहोचली असती. अशा स्थितीमध्ये या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली नसती. मात्र काँग्रेसने वेळीच सावध भूमिका घेऊन हे बंड मोडून काढल्याचे चित्र आहे. हे पाचही आमदार आज विधानसभेत हजर होते. दुसरीकडे समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे जर हे आमदार भाजपाच्या गटात सहभागी झाले असते, तर त्यातील दोन आमदारांना मंत्रीपदे आणि एकाला उपसभापतीपद भाजपकडून ऑफर करण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.