नागपूर : भाजपनं (BJP) पुढील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha) जोरात तयारी सुरु केली आहे. भाजपनं (BJP) राज्यभर मिशन युवा मतदार सुरु केलं असून, 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर भाजप 18 ते 25 वयोगटातील 25 युवा वॅारियर्स नेमणं सुरु केलं. म्हणजे भाजपनं यावेळेस ‘वन बूथ, 25 यूथ’च्या सूत्रानुसार काम सुरु केलं आहे.
त्यामुळेच भाजप मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला तर लागली नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यभरात भाजपचे 25 लाख ‘युवा वॅारीयर्स’ नेमण्याचं काम सुरु झाल्याचं, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलंय.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आमची तयारी नेहमीच सुरु असते. पण 18 ते 25 वयोगटातील युवा वॉरियर्स तयार करण्याचं अभियान आम्ही हाती घेतलं आहे. हे अभियान यशस्वी होणार आहे. मी उत्तर महाराष्ट्र आणि पुण्याचा दौरा केला. जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आपुलकी आहे. युवा मोर्चा आमचा काम करत आहेच. पण युवा वॉरियर्स हे अभियान आम्ही आता सुरु केलं आहे. हा युवा मोर्चाचाच एक भाग आहे”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी केलेल्या विधानावरुन शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. “अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो”, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. गुलाबराव पाटील म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपमध्ये लायकी नाही त्यांना तिकीट मिळत नाही. अरे बाबा तुला तिकीट दिलं नाही, तू काय बढाई मारतो. एकनाथ खडसे यांना तिकीट मिळालं नाही, पण खडसेंच्या मुलींला तिकीट दिलं. ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम भाजपमध्ये होत आहे. आधी आपली दुकानं पक्की करा, मगचं गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करा.”
संबंधित बातम्या
VIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली
राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाही, मनसे-भाजप युतीवर चंद्रकांतदादांचं मोठं विधान