अविश्वासाने स्थापन झालेल्या सरकारसाठी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना त्याग करायला सांगतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : पोटनिवडणुकीच्या (By-election) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र आलो आहोत आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. निवडून आल्यानंतर गुण्यागोविंदाने काम करा असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. आता या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. अविश्वासाने जे सरकार आले ते टिकण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करण्याचे आवाहन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एक जाग जिंकल्यामुळे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, परंतु हिंदुत्त्व न मानणाऱ्या काँग्रेसच्या हातात कोल्हापूरचे सीट जाऊ नये यासाठी भाजपाचा आटापिटा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अविश्वासाने जे सरकार आले ते टिकण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करण्याचे आवाहन करत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एक जागा जिंकल्याने फार मोठा फरक पडणार नाही, मात्र हिंदुत्त्व न माणणाऱ्या काँग्रेसला ती जागा जाता कामा नये यासाठी आमचा आटापिटा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. बंटी पाटील हे नक्कीच तुमचा तंबू उखडून फेकतील असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने ठरवावे कोणासोबत जायचे?
भाजप म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, आम्ही भाजप सोडली म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला देखील चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इथलं हिंदुत्त्व पुसलं जाणार नाही. शिवसेनेने ठरवावे त्यांना काँग्रेससोबत जायचे आहे की, भाजपाच्या भगव्यासोबत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे
ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश