‘मेगाभरती’मुळे भाजपचं कल्चर विचलित, चंद्रकांत पाटलांचा ‘तिरपा बाण’
मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र आणि राज्यातील राजकीय हवा भाजपच्या दिशेने वाहत होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील बऱ्याच बड्या नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. मात्र या ‘मेगाभरती’मुळे चुका झाल्याची जाणीव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on BJP Incoming) यांना झाली आहे.
मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. संख्याबळ वाढवण्याच्या नादात पक्षाचं नुकसान झाल्याची उपरती चंद्रकांत पाटील यांना झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी येथे भाजप शहराध्यक्ष निवडीवेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
विधानसभेच्या तोंडावर राणा जगजितसिंह पाटील, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, राणे पिता-पुत्र, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली होती. मात्र सर्वांनाच विजय खेचून आणता आला नाही. तिकीटासाठी पक्ष बदलणाऱ्या दोन तृतीयांश आयारामांना मतदारांनी घरी बसवलं.
भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासूनच पक्षात चलबिचल सुरु झाली होती. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अन्य पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशांमुळे पक्षात अस्वस्थता पसरली होती, पण त्याबाबत कोणीही जाहीर मत व्यक्त केलं नव्हतं. सत्ता असल्याने त्यावेळी असंतोष बाहेर पडला नाही. सत्ता गेल्यावर मात्र भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वेगवेगळ्या चुकांबाबत विचारमंथन होताना आयाराम नेत्यांमुळे फटका बसल्याचा निष्कर्ष निघाल्याचं पाटलांनी सांगितलं.
यापुढे कोणा विशिष्ट नेत्याच्या जवळ असलेल्यांना नव्हे, तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांना भाजपमध्ये संधी मिळेल, असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
उमेदवारी मागावी लागू नये, ही भाजपची संस्कृती आहे. मेगाभरतीमध्ये ही संस्कृती कुठेतरी ढासळली. ती संस्कृती नव्याने विकसित करण्याची आवश्यकता आहे. हा पक्ष प्रेम-आपुलकीवर, गुणवत्तेवर चालतो, ही लोकांची धारणा स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘पक्षाचे अखिल भारतीय संघटनमंत्री व्ही. सतिश एका बैठकीत म्हणाले होते, जे आपल्या जवळ आहेत, त्यांना नव्हे, तर पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता आहे. हे वाक्य माझ्या मनावर इतके कोरले गेले आहे की आपल्या पक्षात ‘दिल के नजदिक’ असणाऱ्यांना काम देण्याची जास्त पद्धत सुरू झाली आहे’, असं वाटत असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil on BJP Incoming) सांगितलं.