‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल : चंद्रकांत पाटील
आता मुख्यमंत्र्यांना घोषणा आणि अंमलबजावणी यातला फरक समजला असेल, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला
पुणे : ‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल, अशी कोपरखळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil on CM) केला.
उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं हतं. मात्र त्यांनी केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफीची घोषणा केली. काही मर्यादा असतात, याची आम्हाला जाणीव आहे. पण आता त्यांना घोषणा आणि अंमलबजावणी यातला फरक समजला असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल, असं सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन काही जण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण लोकांमध्ये जाऊन याविषयी जागरुकता निर्माण करा, असं आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केलं.
त्याआधी, मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं गुणगान गायलं होतं. कमीत कमी आमदार, तरी राज्यात चमत्कार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोलाही लगावला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली. Chandrakant Patil on CM