भाजपने ‘गॅरंटी’ शब्द चोरला?, कुणाकडून शब्द उचलला? संजय राऊत यांचा दावा काय?
नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. नितीश कुमार यांना पळण्याचा नाद आहे. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होता. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान 290 जागा जिंकेल, असा दावा ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई | 1 मार्च 2024 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या मोदी गॅरंटी या शब्दाची खिल्ली उडवतानाच भाजपने हा शब्द चोरल्याचा दावा केला आहे. भाजपने काँग्रेसचाच शब्द चोरल्याचा दावा राऊत यांनी केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हा शब्द वापरला होता. तो निवडणुकीत क्लिक झाला. लोकांना आवडला. त्यामुळे भाजपचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने हा शब्द चोरला आणि आता लोकसभेत आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये बोलताना संजय राऊत यांनी हा दावा केला.
टीव्ही9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये संजय राऊत आले होते. यावेळी टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. राऊत यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली. कुठे आहे मोदी गॅरंटी? मोदी गॅरंटी फक्त जाहिरातीत आहे. बाकी कुठे आहे? भाजप हा चोरांचा पक्ष आहे. भाजप हा चोरबाजार आहे. त्यांनी काँग्रेसचाच गॅरंटी हा शब्द चोरला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत काँग्रेसने काँग्रेस की छ गॅरंटी अशी घोषणा केली होती.. तिथून आलेला हा गॅरंटीचा फॉर्म्युला भाजपने चोरला. काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या, त्यानंतर भाजप कनार्टकात हरले. त्यामुळे मोदींना वाटलं लोक गॅरंटी शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून हबा शब्द चोरला, असं संजय राऊत म्हणाले.
शिवराळ भाषा वापरत नाही
संजय राऊत शिवराळ भाषा वापरतात असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी त्याचा इन्कार केला. मी कधीच शिवराळ भाषा वापरत नाही. मी असंसदीय शब्द वापरल्याचं दाखवा. मी त्याक्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडेल. मी शिवराळ भाषा वापरत नाही, असं सांगतानाच भाजपवाले काय शब्द वापरतात ते पाहा, असं संजय राऊत म्हणाले.
तेव्हा बोलायचं बंद करेन
संजय राऊत रोज सकाळी उठून बोलतात आणि अजेंडा सेट करतात, असा सवाल करण्यात आला. त्यावरही राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तुम्ही येतात म्हणून मी बोलतो. तुम्ही यायचं थांबला तर मी बोलायचं थांबेल. मी राजकारणी आहे. माझ्या पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी मी बोलत असतो. जेव्हा वाटेल लोक माझं ऐकत नाही, तेव्हा मी बोलण्याचं बंद करेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
मोदी पंतप्रधान होणार नाहीत
इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर राऊत यांनी तात्काळ उत्तर दिलं. मोदी पंतप्रधान होणार नाहीत, एवढ्या जागांचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. 220च्या पुढे भाजप जात नाही. भाजपचं सरकार येतच नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा. राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा? उत्तर प्रदेशातील 80 जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरयाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या. तरीही भाजप 220च्या पुढे जाणार नाही, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.