मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने घेरलं; नाना पटोले यांचा मोठा दावा
इंडीया आघाडीत कॉंग्रेसला किती जागा मिळाल्या हा प्रश्न नाही. तर लोकशाही आणि संविधान वाचवणं ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. सत्तेतील लोकांमुळे नाही असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. टीव्ही 9 मराठीच्या 'लोकसभेचा महासंग्राम' या कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
मुंबई | 1 मार्च 2024 : मराठा आंदोलनात राज्य सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले. जर मराठ्यांना आरक्षण द्यायचे होते तर ईडी किंवा येड्याचं सरकार आले तेव्हाच का नाही मराठ्यांना आरक्षण दिले नाही असा खरमरीत सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीच्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. भाजपा नेहमीच अब की 400 पारचा नारा देत असते. त्याचा गर्व भाजपा करीत विरोधकांना संपवित आहे. राजीव गांधी यांच्या काळात आम्हाला 400 वर जागा मिळाल्या. पण आम्ही कधी अहंकार केला नाही. यांनी कितीही घोषणा करू द्या. त्या चालणार नाहीत. लोकांची मानसिकता वेगळी आहे. इंडिया आघाडीच्या दिशेने देशाचा कौल येईल असा दावा नाना पटोळे यांनी केला आहे.
तिकीट वाटप होऊ द्या, मग काय होते पाहा
येत्या आठ ते दहा दिवसात आचार संहिता लागणार आहे. एकदा लोकसभेचे तिकीट वाटू द्या. मग भाजपमध्ये काय होतं ते पाहा असे नाना पटोले यावेळी म्हणाले. राज्यावर आठ लाख कोटीचं कर्ज आहे. या सरकारने राज्याचं दिवाळं निघालं आहे आणि वन ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची भाषा करत आहेत. कर्ज घेऊन दिवाळी करण्याचं काम सुरू आहे. केवळ जाहिरातबाजी सुरू आहे. निवडणुकीत साड्या वाटण्याची तरतूदही बजेटमध्ये केली आहे. साड्या वाटल्या म्हणून जिंकू असं वाटतंय का असा सवाल यांनी त्यांनी केला. त्यामुळे हे जनतेच्या हिताचं बजेट नव्हते असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना भाजपाने घेरले आहे
मराठ्यांना सरकार आल्यानंतर लागलीच आरक्षण का दिले नाही. आता निवडणूकीच्या तोंडावर आरक्षण दिले आहे. सरकारने मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं काय बोलणं झालं ते जाहीर करावे. मुख्यमंत्र्यांना भाजपने घेरले आहे. ते बोलायला तयार नाही. भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. आम्हालाही घेरलं जात आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. हिंमत होती तर ईडी आणि येड्याचं सरकार आल्यानंतर यांनी तातडीने आरक्षण का दिलं नाही. गायकवाड आयोगाने सांगितले. 30 टक्के मराठा राज्यात आहे. शुक्रे आयोग म्हणतंय 28 टक्के मराठा आहे. पाच वर्षात मराठ्यांची संख्या वाढायला हवी होती की कमी व्हायला हवी होती ? सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टी सांगितल्या त्याची अंमलबजावणी झालीच नाही. फक्त निवडणुकीसाठी आरक्षण दिले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे धनगर समाजाचंही तसंच केलं. दहा वर्ष त्यांची मते घेतली. संघ वनवासी कल्याण ही संस्था चालवते. ती संस्था धनगरांच्या आता विरोधात गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.