Aurangabad : भाजपाकडून शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची तयारी; औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत युती!
औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेनेचे (Shiv sena) वर्चस्व आहे. औरंगाबादमधील शिवेसनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी आता भाजपाने सुरू केली आहे. निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमधून (Aurangabad) मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या प्रमख शहारांतील महापालिकांच्या निवडणुका (Election 2022) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद महापालिकेचा देखील समावेश आहे. सध्या औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेनेचे (Shiv sena) वर्चस्व आहे. औरंगाबादमधील शिवेसनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी आता भाजपाने सुरू केली आहे. याचा पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुद्धा झाली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिंदे गट आणि भाजपा औरंगाबाद महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांकडून देखील दुजोरा देण्यात येत आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच निवडणूक लढवण्याबाबतची रणनीती आणि जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे.
…तर शिवसेनेच्या अडचणी वाढणार?
औरंगाबाद हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास अनेक वर्ष शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे खासदार होते. तर सध्या शिंदे गटात सहभागी असलेले दोन आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ हे औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावरच निवडून आलेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील हा गड शिंदे गटाच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर भाजपाने शिंदे गटासोबत युती केल्यास औरंगाबाद महापालिका निवडणूक हे शिवसेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे.
इतर शहरातही युतीची शक्यता
दरम्यान औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपामध्ये युती झाल्यास इतर शहरात देखील अशीच युती होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो. शिवसेनेतून अनेक नेते फुटून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपाने जर शिंदे गटासोबत युती केली तर राज्यातील ज्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्यातील अनेक शहरातील सत्ता गमावण्याची वेळ शिवसेनेवर येऊ शकते असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.