अहमदनगर : काँग्रेस आणि आघाडीची चर्चा सुरु असली तरी नगरमध्ये सर्वांना एकच प्रश्न पडलाय आणि तो म्हणजे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखेंचं काय होणार? यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघ चर्चेत आलाय. आघाडीत नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे पेच झालाय. राष्ट्रवादीही ही जागा सोडण्यासाठी तयार नाही. त्यामुळे नाराज असलेले विखे पिता-पुत्र भाजपात जातील अशीही चर्चा आहे. पण भाजपमध्येही त्यांना विरोध आहे. त्यामुळे लोकसभेसाठी विखेंचा मार्ग खडतर होऊन बसलाय.
नगर जिल्हा म्हटलं की विखे परिवाराचं नाव पहिल्यांदा समोर येतं. जिल्ह्यात दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांपासून विखे परिवाराचं मोठं वर्चस्व आहे. तर सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील नगर दक्षिण मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या साडे चार वर्षांपासून जिल्हा पिंजून काढलाय. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण आहे. सध्या सुजय विखे यांची सर्वच राजकीय पक्षांकडून हेटाळणी सुरू आहे. पवार आणि विखे कुटुंबातीच हाडवैर सर्व राज्याला माहित आहे. बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांचा राजकिय संघर्ष तर अख्ख्या महाराष्ट्राने पहिलाय. मात्र तो संघर्ष दुसऱ्या पिढीतही तसाच राहिला. मध्यंतरीच्या काळात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी सुजय विखे यांची भेट घेतली. त्यानंतर विखे आणि पवार यांचा संघर्ष तिसऱ्या पिढीने संपवल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली. मात्र पवारांनी कधी नगरची जागा काँग्रेसला सोडली, तर विखे राष्ट्रवादी येणार असल्याचं सांगितलं, मात्र पुन्हा ही आपले वक्तव्य फिरवल्याचं आपण पाहिलंय. विखे पाटील आणि पवारांचा संघर्ष पाहता कोणत्याही परिस्थितीत विखेंचं वर्चस्व निर्माण होऊ द्यायचं नाही हीच भूमिका पवारांची असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे मागील संघर्ष पाहता पवार विखेंना सहजासहजी नगरची जागा सोडणार नाही असं जाणकारांचं मत आहे.
विखेंना पक्षात घेण्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरं तर आघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचा घट्ट जाळं या मतदारसंघात आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून ते खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर ते तरंगले. मात्र यावेळी मंत्रीपदाचे लॉबिंग केल्याने मोदी त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसतंय. तर भाजपाकडून लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात आघाडीवर आहेत जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड. ऐन वेळी सुजय विखे पाटील भाजपात येणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र विखेंना कोणत्याही परिस्थितीत भाजपात घेणार नसल्याचं बेरड यांनी सांगितलंय.
अहमदनगर दक्षिण हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे. राष्ट्रवादी तीन आमदारांसह दुसर्या स्थानावर, तर शिवसेना आणि काँग्रेस एका आमदारासह तिसर्या स्थानी आहेत. शरद पवार जी भूमिका घेतील, ती आम्हाला मान्य राहिल असं मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केलंय.
मतदार पक्ष आमदार
राहुरी – भाजप शिवाजी कर्डीले
शेवगाव – पाथर्डी भाजप मोनिका राजळे
कर्जत – जामखेड भाजप राम शिंदे
नगर शहर राष्ट्रवादी संग्राम जगताप
पारनेर सेना विजय औटी
श्रीगोंदा राष्ट्रवादी राहुल जगताप
जागा काँग्रेसला सोडली नाही तरी लढण्याचा निर्णय सुजय विखेंनी घेतलाय. वेळप्रसंगी काँग्रेस सोडण्याचा नुकताच त्यांनी इशारा दिलाय. सुजय विखेंची भाजपाकडूनही चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. काहीही असले तरी सुजय यांनी प्रत्येक तालुक्यात झेडपी गटात वैद्यकीय शिबिरं घेतली आहेत. सुजय विखेंनी जनसंपर्क वाढवला असून तयारी केली आहे. त्यामुळे आता विखेंच्या भूमिकेकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय.