भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांचा पहिलाच मुंबई दौरा, उद्धव ठाकरेंची भेट नाही
जेपी नड्डा विविध ठिकाणी भेटी देणार असून ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही संबोधित करतील. पण त्यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नाही. या दोन दिवसीय दौऱ्यात जेपी नड्डा यांच्याकडून आगामी विधानसभेबाबत आढावा घेतला जाणार असून निवडणुकीची तयारी सुरु केली जाणार आहे.
मुंबई : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बैठकांचं आयोजन केलंय. पण या दौऱ्यात जेपी नड्डा (J P Nadda) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची भेट घेणार नाहीत. जेपी नड्डा विविध ठिकाणी भेटी देणार असून ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही संबोधित करतील. पण त्यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीचा कोणताही उल्लेख नाही. या दोन दिवसीय दौऱ्यात जेपी नड्डा यांच्याकडून आगामी विधानसभेबाबत आढावा घेतला जाणार असून निवडणुकीची तयारी सुरु केली जाणार आहे.
जेपी नड्डा मुंबईत आल्यानंतर अगोदर प्रदेश कमिटी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. यानंतर आमदार आणि खासदारांचीही बैठक घेण्यात आली. शिवाय 20 जणांच्या कोअर कमिटीच्या बैठकीचंही आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. जेपी नड्डा चैत्यभूमी, सावरकर स्मारक, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.
पुढच्या दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. गोरेगावमध्ये रविवारी होणाऱ्या मेळाव्याला सात हजार कार्यकर्ते उपस्थित असतील. 1 ऑगस्टपासून विकास यात्रा निघणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दरम्यान, जागा वाटप आणि मुख्यमंत्री कुणाचा या मुद्द्यावर बोलणं चंद्रकांत पाटलांनी टाळलं. मुख्यमंत्री आमचाच होईल, हे प्रत्येक पक्षाला बोलावं लागतं, असं ते म्हणाले. शिवाय जागावाटपावर आत्ताच बोलणं घाईचं ठरेल, असं सांगत ज्या जागा भाजपच्या वाट्याला येतील त्यासाठी ताकदीने काम करु आणि 288 जागांवर मित्रपक्षांनाही मदत करु, असं त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ :