बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा का दिला?; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात,…

| Updated on: Feb 08, 2023 | 7:58 AM

तिथं आंदोलन सुरू होतं. त्यावेळी थोडी चर्चा झाली. १५ तारखेला एस. के. पाटील हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी येतील. तेव्हा या विषयावर सविस्तर चर्चा होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा का दिला?; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात,...
पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

सातारा : नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होण्यापूर्वी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे प्रदेश अध्यक्ष होते. बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी नाना पटोले (Nana Patole) यांना संधी देण्यात आली. तेव्हापासून बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यानंतर वादाची ठिणगी पडली ती नाशिक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त. काँग्रेसचा तिथं सिटिंग आमदार होता. त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. पण, आमदार तांबे यांना त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना उमेदवारी द्यायची होती. एबी फार्म सत्यजित यांच्या वडिलांच्या नावानं आला. त्यामुळं सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात भाजपच्या पाठिंब्याने ते विजयीसुद्धा झाले. नंतर बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यावरून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

याबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मीडियामध्ये बातम्या पाहिल्या. बाळासाहेब थोरात यांनी काहीतरी पत्र लिहिलेलं आहे. पण, मी याबाबत कुणाशीही अधिकृत बोललो नाही. नॅशनल हायवेसंबंधात महत्त्वाची मिटिंग होती. त्यामध्ये मी व्यस्त होतो. पण, सोशल मीडियावर बातम्या पाहिल्या आहेत.


पक्षांतर्गत विषय आहे

आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा ट्वीटरवर दिल्या आहेत. पण, माझं बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. यात काय घडामोडी घडल्या याची माहिती घेऊन आपल्याशी बोलेन, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काहीही असलं तरी हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळं जास्त भाष्य करणार नाही. नाशिक विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यामध्ये काही घटना घडल्या. त्यामुळं पक्षामध्ये नाराजीचं वातावरण आहे. कारण नाशिकची जागा ही काँग्रेसची हक्काने निवडून येणारी जागा होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पक्षाकडून चौकशी होत आहे

विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी पक्षाकडून होत आहे. नेमकं काय घटनाचक्र घडलं. काय टाळता आलं असतं. पण, यावर जाहीर भाष्य करता येणार नाही. माझं यावर कुणाशी काही जास्त बोलणं झालं नाही. त्यामुळं व्यक्तिगत मला फारसी माहिती नाही. १५ फेब्रुवारीला कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यावेळी सर्व एकमेकांना भेटतील. त्यावेळी चर्चा होईल.

तेव्हा सविस्तर चर्चा होणार

पुण्याला काल पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. तिथं आंदोलन सुरू होतं. त्यावेळी थोडी चर्चा झाली. १५ तारखेला एस. के. पाटील हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी येतील. तेव्हा या विषयावर सविस्तर चर्चा होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.