लोकसभेसाठी भाजपचं थीम सॉन्ग लाँच
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यासोबतच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारालाही वेग आला आहे. आज भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच करण्यात आलं. तसेच 2019 च्या लोकसभा […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत, त्यासोबतच राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारालाही वेग आला आहे. आज भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाची टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच केलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन आणि थीम सॉन्ग लाँच करण्यात आलं. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीचीही माहिती देण्यात आली.
Delhi: BJP releases party’s tag line and theme song for the #LokSabhaElections2019 pic.twitter.com/wbRKzp92wX
— ANI (@ANI) April 7, 2019
2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने ‘अबकी बार मोदी सरकार’ या टॅगलाईनवर निवडणूक लढवली होती. तर यावेळी भाजप ‘फिर एक बार मोदी सरकार’ या टॅगलाईनसोबत मैदानात उतरली आहे. भाजप तीन संकल्पनेवर काम करत असल्याचं जेटलींनी सांगितलं. पहिली संकल्पना ही ‘काम करणारं सरकार’, दुसरी ‘प्रामाणिक सरकार’ आणि तिसरी ‘मोठे निर्णय घेणारं सरकार’ अशा तीन संकल्पनांवर भाजप यावेळी निवडणूक लढवणार आहे.
चलो फिर एक बार हम मोदी सरकार बनाते हैं,
चलो मिलकर साथ आगे देश को बढ़ाते हैं। #PhirEkBaarModiSarkar #IsBaarPhirModi pic.twitter.com/6I5vi6B71Y
— BJP (@BJP4India) April 7, 2019
भाजपच्या प्रचाराबाबत जेटली म्हणाले, “आमचा प्रचार अभियान हा आमच्या पाच वर्षांच्या सर्व कामाचं एकत्रीकरण आहे. यामध्ये सरकारच्या यशाबाबत माहिती देण्यात आली आहे“. ‘अबकी बार फिर मोदी सरकार’ ही भाजपची नवीन टॅगलाईन आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचंही जेटलींनी सांगितलं. “पाच वर्षांत आमच्या सरकारने एकदाही कर वाढवलेला नाही. आमच्या सरकारमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमचा काम करण्यावर विश्वास आहे“, असेही जेटली म्हणाले.
यावेळी जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीकाही केली. ‘केंद्रात मजबूत सरकार बनावं असं त्यांना वाटत नाही. काँग्रेसने 72 वर्षांत काहीही केलेलं नाही. आम्ही पाच वर्षांत खूप कामं केली. काँग्रेसचा जाहीरनामा पाहून आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या जाहीरनाम्यात मध्यमवर्गीयांसाठी काहीच नाही. आता देशाच्या जनतेलाच ठरवायचे आहे की, त्यांना मजबूत सरकार हवं की मजबूर सरकार‘, असा घणाघात जेटलींनी केला. काँग्रेसनेही आज ‘अब होगा न्याय‘ ही टॅगलाईन प्रसिद्ध केली. तसेच, ही टॅगलाईन असलेले अनेक पोस्टरही प्रसिद्ध केले.