BMC Election 2022 : ठाकरे सरकारची मुंबईतील प्रभाग रचना आणि आरक्षण रद्द होणार?, काँग्रेसच्या मागणीची भाजपकडून तातडीने दखल
काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय. महत्वाची बाब म्हणजे फडणवीस यांनी देवरा यांच्या पत्राची तातडीने दखलही घेतलीय!
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही निर्णय रद्द करण्याची मोहीम हाती घेतलीय. त्यात ठाकरे सरकारच्या काळातील मुंबईतील प्रभाग रचना आणि वार्ड आरक्षणही (Ward Reservation) रद्द केलं जाण्याची शक्यता आहे. कारण, ठाकरे सरकारच्या काळात झालेली महापालिका प्रभाग रचना आणि वार्ड आरक्षण रद्द करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलंय. महत्वाची बाब म्हणजे फडणवीस यांनी देवरा यांच्या पत्राची तातडीने दखलही घेतलीय!
मिलिंद देवरा यांचं शिंदे, फडणवीसांना पत्र
तत्कालीन राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना केली. फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या या प्रभाग रचनेविरोधात अनेक राजकीय आणि अराजकीय विरोधी दर्शवणारी जवळपास 800 पत्रे प्राप्त झाली. या पत्रांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे होते. मात्र तत्कालिक राज्य सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही, हे खेदाने नमूद करावे वाटते.
प्रभागांची संख्या 227 रुन 236 करण्यापूर्वी नव्याने जनगणना करणे आवश्यक होते. तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेमध्ये 2011 सालच्या जनगणनेकडेदेखील दुर्लक्ष केले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे या मताशी आपणदेखील सहमत असाल. त्यामुळे या संदर्भात मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तथाकथित प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण धोरणाला आपण त्वरीत रद्दबातल करावे आणि पारदर्शक पद्धतीने नवीन प्रभाग रचना करण्यासाठी एक स्वतंत्र समितीची नेमणूक करावी अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर या सर्व प्रकरणात सर्वच राजकीय पक्षाची भूमिका महत्वाची असल्यामुळे आगामी काळात आपण यासंदर्भात बैठक बोलावून सदर संदर्भात चर्चा करावी अशी मी विनंती करत आहे.
काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की, आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सदर एकाच पक्षाला फायदेशीर ठरणारी प्रभाग पुनर्रचना रद्दबातल करावी आणि नवीन पारदर्शक प्रभाग रचना अंमलात आणावी, अशी मागणी देवरा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलीय.
My letter to @mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji urging them to nullify @mybmc’s recently concluded ward-wise delimitation & reservation.
Mumbai’s wards were gerrymandered in violation of MVA’s coalition Dharma to benefit @ShivSena.
Mumbaikars deserve free & fair elections. pic.twitter.com/1ozXCvjNjg
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) July 13, 2022
देवरांच्या पत्राची फडणवीसांकडून दखल
देवरा यांच्या मागणीची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. मिलिंद देवराजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला लिहिलेले पत्र समाजमाध्यमातून प्राप्त झाले. आपण व्यक्त केलेल्या भावनांची योग्य दखल घेतली जाईल तसेच आपण मुंबईकर आणि निष्पक्ष निवडणुकांसंदर्भात जी अपेक्षा व्यक्त केली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल!, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
Shri @milinddeora ji, Received your letter addressed to CM Eknathrao Shinde and me on social media. We have noted your sentiments & will definitely try to address your concerns for Mumbaikars and for free and fair elections. Thanks !@mieknathshinde https://t.co/Vbnp5GIzCT
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 13, 2022
काँग्रेसचा आक्षेप नेमका काय?
मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. मुंबईतून काँग्रेस संपवण्याचा डाव असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला होता. नगरविकास खात्याच्या निर्देशानुसारच प्रशासनानं मुंबईतील वार्ड पुनर्रचना आणि आरक्षणात फेरफार करण्यात आली. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीत. शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केले. मुंबईत काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत विलीन केल्याचा आरोपही रवी राजा यांनी केलाय.