Navneet Rana : बीएमसीचा राणा दाम्पत्याला अल्टिमेटम, 7 ते 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश
पालिकेने दिलेल्या नोटिशीनंतर राणा दाम्पत्य नियमिततेसाठी अर्ज करू शकतं. तसेच त्यावर महापालिका विचार करेल. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं असल्याने राणा दाम्पत्याला पालिकेकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या खार येथील घराची पाहणी केल्यानंतर 24 उलटताचं बीएमसीने (BMC) अनधिकृत बांधकामांसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने त्यांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. नुकतीच त्यांना दुसरी अनधिकृत बांधकामा संदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 7 ते 15 दिवसांच्या आत केलेलं बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल असं म्हटलं आहे. महापालिकेने दिलेल्या नोटीशीनंतर राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अन्यथा कारवाई करण्याचा इशारा
खार येथे घर असलेल्या राणा दाम्पत्याच्या इमारतीचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त बांधकाम का केलं ? असा प्रश्न नोटिशीतून पालिकेतील अधिकाऱ्यांनी विचारला आहे. तसेच संबंधित केलेले अनधिकृत बांधृकाम 7 ते 15 दिवसांच्या आत पाडा, अन्यथा आम्ही कारवाई करू असा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
पालिकेकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमी
पालिकेने दिलेल्या नोटिशीनंतर राणा दाम्पत्य नियमिततेसाठी अर्ज करू शकतं. तसेच त्यावर महापालिका विचार करेल. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं असल्याने राणा दाम्पत्याला पालिकेकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
सूडबुद्धीने कारवाई
मुंबई महापालिकेची आलेली नोटीस म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन दिली गेलेली नोटीस आहे. खारमध्ये आमचं एकचं घर आहे. सेनेतल्या नेत्यांसारखी आमची असंख्य घरं नाहीत. तसेच ते आमचं घर पाडू शकतात. या आगोदर देखील त्यांनी अनेकांची मुंबईत घरे पाडली आहेत.
आमच्या विरोधात त्यांनी कितीही कारवाई केली तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहणार अशी प्रतिक्रिया राणा दाम्पत्याने नोटीशीनंतर दिली होती.