कालच्या राड्यानंतर पुन्हा वातावरण तापलं, मुंबई महापालिकेत ठाकरे गट आक्रमक, बोके-खोके घोषणांसह काय मागणी?
भाजपसहित शिंदे गट तसेच ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी काल झालेल्या राड्यावर एकमेकांना आव्हान देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबईः काल मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) झालेल्या राड्यानंतर आज ठाकरे (Thackeray) गटाच्या माजी नगरसेवकांनी (Former Corporator) पुन्हा एकदा बीएमसीत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा तर सुरूच आहेत. शिवाय महापालिका प्रशासानाने बंद केलेलं शिवसेनेचं कार्यालय पुन्हा सुरु करण्याची जोरदार मागणी त्यांनी लावून धरली आहे.
महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी हे माजी नगरसेवक एकवटले असून जोपर्यंत हे कार्यालय सुरु होणार नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने कुणाच्या आदेशाने कार्यालयाला कुलूप लावले आहे, असा सवाल ठाकरे गटाकडून विचारण्यात येतोय.
काल काय घडलं?
बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील शिवसेना कार्यालय गाठलं. त्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या.
त्यानंतर काही मिनिटातच उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार आणि नगरसेवक तसेच शिवसैनिक त्या ठिकाणी दाखल झाले. शिवसेना कार्यालयाच्या हॉलमध्ये दोन्ही गट आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना आवर घालताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले.
अखेर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना कार्यालयातून बाहेर काढलं. त्यानंतर महापालिकेला काही काळ छावणीचं स्वरुप आलं होतं. प्रशासनाने या कार्यालयाला कुलूप ठोकलं.
त्यानंतर भाजपसहित शिंदे गट तसेच ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी काल झालेल्या राड्यावर एकमेकांना आव्हान देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या.