बॉम्बस्फोटाचा आरोपी सलीम कुत्ता मेला की जिवंत ? वस्तुस्थिती काय?
मुुंबई बॉम्बस्फोट मालीकेतील आरोपी सलीम कुत्ता याच्यावर महाराष्ट्राचे राजकारण ढवळलं आहे. सलीम कुत्ता याची 1998 रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा कॉंग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गौरंट्याला यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सलीम कुत्ता मेला की जीवंत आहे यावरून उलट सुलट दावे केले जात असताना आता नवीन माहीती हाती आली आहे....
मुंबई | 18 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता सोबत पार्टीत डान्स करतानाचा व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी विधान सभेत सादर करुन खळबळ माजविली. त्यानंतर हा सलीम कुत्ता आधीच मेला असल्याचा नवा दावा कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. सलीम कुत्ताची हत्या 1998 मध्ये झाल्याचा हा दावा होता. त्यामुळे बडगुजर यांच्या सोबत सलीम कुत्ता कोण ? असा प्रश्न गोरंट्याल यांनी उपस्थित केला होता. आता सलीम कुत्ता याच्या बाबत नवीनच माहीती समोर आली आहे.
दाऊदची मालमत्ता विकत घेतल्याच्या आरोपावरून जामीनावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नबाव मलिक हे अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्याने शिवसेनेने भाजपाला डिवचल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना भाजप कोणत्याही स्थितीत स्वीकारणार नाही असा लेटर बॉम्ब अजित पवार यांच्यावर टाकला. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नाशिक शहर प्रमुख सुधारक बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबरचा बडगुजर यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सादर केल्याने खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याची 1998 मध्ये रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा केला. त्यामुळे सलीम कुत्ता नेमका जीवंत आहे की मेला ? असा सवाल निर्माण झाला आहे.
नाशिक असताना पॅरोल मिळाला
12 मार्च 1993 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा साल 2016 पासून येरवडा कारागृहात सजा भोगत असल्याचे उघडकीस आले आहे. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असतानाच कुत्ता पॅरोलवर सुटला होता आणि डान्स करतानाचा त्याचा व्हायरल व्हिडीओ त्याच वेळचा असल्याचा दावा केला जात आहे. साल 2016 नंतर येरवडा जेल मधून सलीम कुत्ता पॅरोलवर कधीच बाहेर आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1998 मध्ये रुग्णालयात हत्या झाली त्याचे नाव सलीम कुत्ता नसून सलीम कुर्ला असल्याचे म्हटले जात आहे.
येरवड्यात अंडासेलमध्ये आहे
16 डिसेंबर 2016 ला सलीम मीरा शेख उर्फ कुत्ता याला पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून तो अंडा सेलमधे आहे आणि तेव्हापासून त्याला पॅरोल किंवा कुठलीही रजा मिळालेली नाही. येरवडा कारागृहात येण्याआधी सलीम शेख हा नाशिक कारागृहात बंदिस्त होता. तिथे त्याला पॅरोल मिळाला होता. त्या पॅरोलच्या काळातील डान्सचा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे.सलीम कुत्ता याने मुंबई बॉम्बस्फोट मालिकेसाठी स्फोटकांची वाहतूक करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.