उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेल्या लेखात दिला आहे. (Break alliance with NCP and Congress says Subramanian Swamy to Uddhav Thackeray)
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती तोडावी, असा सल्ला राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी दिला. ‘राष्ट्रपती राजवट- महाराष्ट्रासाठी एकमेव मार्ग?’ हा लेख शेअर करताना स्वामींनी ही टिप्पणी केली. (Break alliance with NCP and Congress says Subramanian Swamy to Uddhav Thackeray)
“आता किंवा कधीच नाही, उद्धव ठाकरे, आताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेली युती तोडा, अन्यथा ते तुम्हाला कट रचल्याप्रमाणे उद्ध्वस्त करतील” अशा आशयाचे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra? https://t.co/4KKOraQpw8 via @PGurus1 : My view: “Time is now or never: Uddhav break the alliance now otherwise NCP and Congress will destroy you by staged events”
— Subramanian Swamy (@Swamy39) May 20, 2020
भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. कोरोनाग्रस्तांपैकी 33 टक्के महाराष्ट्रातील, तर देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 20 टक्के मुंबईत आहेत, अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केलेल्या ‘पीगुरुज’ वेबसाईटच्या लेखात आहे.
या लेखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला या लेखात केला आहे. मात्र या तर्कानुसार भाजपशासित गुजरात राष्ट्रपती राजवटीसाठी योग्य आहे, असं उत्तर काही जणांनी सुब्रमण्यम स्वामी यांना दिलं. पंधरा दिवसांपूर्वीच स्वामी यांनी मोदी सरकारला स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे भाडे आकारण्याबद्दल सवाल केला होता.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजप नेते ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला आक्रमकपणे लक्ष्य करत आहेत. संकटाला तोंड देण्यासाठी ज्याप्रमाणे प्रभावी पावले उचलणे आवश्यक होते, ती वेळेवर घेतलेली नाहीत,असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. (Break alliance with NCP and Congress says Subramanian Swamy to Uddhav Thackeray)