मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी केली आहे. यंदाच्या या निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यापेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक महत्व मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण (Politics) सुरु आहे. त्याचे सावट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर दिसणार आहे. महापालिकेचा वॉर्ड क्रमांक 94 हा शिवसेने (Shivsena)चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील. त्यामुळे या वॉर्डमध्ये शिवसेनेचे पारडे जड मानले जाते. मात्र असे असले तरी 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीची आकडेवारी पाहता शिवसेनेला या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही, असेच दिसतेय. कारण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा भुतकर यांना तीन पक्षांनी कडवी लढत दिली. यंदा भाजप मोठ्या ताकदीने आव्हान देण्याची तयारी करीत आहे. त्या अनुषंगाने ह्या वॉर्डातील निवडणूक फार लक्षवेधी असणार आहे.
2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या प्रज्ञा दीपक भूतकर यांनी बाजी मारली. त्यांना सर्वाधिक 8617 मते मिळाली. मात्र हा विजय मिळवताना त्यांना प्रमुख राजकीय पक्षांना कडवी झुंज द्यावी लागली. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुसऱ्या क्रमांकाची अर्थात 6942 मते मिळवली. तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ. स्नेहल जाजू (वर्दे) यांना 5535 मते मिळाली, तर भाजपच्या सोनाली तायशेटे यांना 5269 मते मिळाली होती. त्यासह इतर छोट्या पक्षांनी एकूण 1 हजारांवर मते मिळवली होती. निवडणुकीत 27851 इतकी वैध मते नोंद झाली होती. त्या मतांनी उमेदवारांचे भवितव्य ठरवले होते.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांचे भवितव्य बहुसंख्येने असलेल्या मराठी मतदारांच्या हाती आहे. कारण मागच्या निवडणुकीत मराठी मतदारांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांत चुरशीची लढत झाली होती. त्यात शिवसेनेच्या प्रज्ञा भुतेकर यांनी मताधिक्य मिळवले. प्रज्ञा भुतेकर यांचे पती दीपक भुतेकर हेदेखील याआधी नगरसेवक होते. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा आणि अनुभवाचा प्रज्ञा भुतेकर यांना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना फायदा झाला. त्या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेनाच आपला गड शाबूत ठेवते कि मनसे आपला झेंडा फडकावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यंदाच्या निवडणुकीची नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात वॉर्ड क्रमांक 94 हा सर्वसाधारणसाठीच खुला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे खुल्या प्रवर्गातून दमदार उमेदवार देऊन निवडणूक किती रंजक बनवताहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.