100 कोटींवरुन मातोश्रीवर निशाणा साधणाऱ्या प्रतापराव जाधवांना थेट केंद्रात जबाबदारी! चर्चा तर होणारच…
मातोश्रीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे प्रतापराव जाधव चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
गणेश सोलंकी, TV9 मराठी, बुलढाणा : बुलढाण्याच्या खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची केंद्र सरकारने (Central Government) दखल घेतलीय. त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आलीय. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. मोदी सरकारकडून (Modi Government) शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या घडामोडीची राजकीय चर्चा झाली नाही, तरच नवल!
संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या रुपाने शिंदे गटाला माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधवांकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय.
पाहा व्हिडीओ :
सनसनाटी आरोपांमुळे चर्चेत
उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतापराव जाधव यांनी नुकताच सनसनाटी आरोप केला होता. सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता, अशा आशयाचं प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या आरोपावरुन एकच खळबळ उडाली होती. अखेर प्रतापराव जाधव यांनी आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, असंही नंतर स्पष्ट केलं होतं.
100 खोके मातोश्री ओके, असं वक्तव्य केल्यामुळे प्रतापराव जाधवांनी एकच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, प्रतापराव जाधव यांना दिलेली जबाबदारी म्हणजे मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात देण्यात आलेलं पहिलं गिफ्ट असल्याची चर्चा रंगलीय. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय.