निवडणुकीतील विजयानंतर सत्कार नाकारला, नुकसान पाहणीसाठी आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित सर्वच आमदार सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. मात्र, बुलडाणा विधानसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड (Buldhana MLA Sanjay Gaikwad) याला अपवाद आहेत.
बुलडाणा : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित सर्वच आमदार सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. मात्र, बुलडाणा विधानसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड (Buldhana MLA Sanjay Gaikwad) याला अपवाद आहेत. 24 ऑक्टोबरला निवडून आल्यानंतर गायकवाड यांच्या समर्थकांनी त्यांचा सत्कार आयोजित केला, मात्र गायकवाड सत्कार न स्वीकारता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. अतिवृष्टीमुळे शेतकरी (Heavy Rain Damage Farm) अडचणीत सापडला आहे. अशावेळी गायकवाड यांनी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
बुलडाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बुलडाण्यात याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा तालुक्यातील वरवंड, डोंगरखंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांची आणि शेतीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देत दोन्ही तालुके ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
मागील 5 ते 6 वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे याही वर्षी 4 दिवसांपासून बुलडाणा, मोताळासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेतामधील सोयाबीन, कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पिक, शेतामध्ये उभ्या केलेल्या सुड्या, बोंड फुटलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
ज्वारी आणि सोयाबीनला अंकुर फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे.