बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का, आमदार विलास तरेंचा शिवसेनेत प्रवेश
बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरेंनी आज आपल्या हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. ते मागील दोन टर्म बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली.
मुंबई : बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरेंनी आज आपल्या हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. ते मागील दोन टर्म बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेची वाट धरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरे यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
शिवसेनेत येणाऱ्यांसाठी आम्ही काही टार्गेट ठेवलेलं नाही. अजून कोण कोण येणार हे लवकरच कळेल, असं सुचक विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे. मी, मुख्यमंत्री आणि अमित शाह लवकरच जागावाटप करणार आहे. चांगले काम करण्यासाठी सहकारी मिळत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे.”
बोईसर मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/kmZLYtWPSR
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 25, 2019
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे असं विचारत टोला लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे कोणतीही वॉशिंग पॉवडर नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेचं काम पाहून अनेक नेते शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.