मुंबई : नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळात भाजप (BJP) आणि शिंदे (Shinde) गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून देखील नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. अखेर आता लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळाबाबत सर्व वाटाघाटी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फडणवीस आणि शिंदे महाराष्ट्रात परतताच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.
नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याबाबतची यादी भाजपाने फायनल केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी भाजपाच्या पक्षक्षेष्ठींची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदा भाजपाकडून काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यात परतताच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रेबाबत अद्याप सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणे बाकी आहे. सोमवारी त्याबाबत सुनावणी आहे. त्यामुळे देखील निकाल रखडल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने विरोधकांकडून नव्या सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे हजारो लोकांवर स्थलांतरणाची वेळ आली. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत राज्याला मदतीची आवश्यकता असताना मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.