खासदारकीला आडवे, आमदारकीला उभे, दिग्गजांचा निकाल काय?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) गाठण्यात भाजपला अपयश आलं.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) गाठण्यात भाजपला अपयश आलं. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या तर राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या निवडणुकीत लोकसभा लढवलेले अनेक उमेदवार रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवत होते.
लोकसभा निवडणूक मे महिन्यात पार पडली. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली. म्हणजेच 5 महिन्यात हे उमेदवार दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा लढवणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडूनही असे अनेकजण विधानसभेच्या रिंगणात होते, ज्यांनी लोकसभा लढवली होती.
लोकसभा पराभवानंतर विधानसभा लढवणारे उमेदवार
अशोक चव्हाण (काँग्रेस) – विजयी
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या प्रताप चिखलीकरांनी त्यांचा पराभव केला होता. आता विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून विजय मिळवला.
संग्राम जगताप (राष्ट्रवादी) – विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्यावर भाजपचे सुजय विखे यांनी मात केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी विजय मिळवला.
नाना पटोले (काँग्रेस) – विजयी
नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना नितीन गडकरींनी पराभूत केलं होतं. मात्र भंडाऱ्यातील साकोली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या नाना पटोले यांनी भाजपचे विद्यमान मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला.
राणा जगजीतसिंह – विजयी
राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीत होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कमळ चिन्हावर त्यांनी तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवली. त्यांचा विजयही झाला.
माणिकराव कोकाटे (सिन्नर) – विजयी
माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढले. त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. कोकाटे यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
कुणाल पाटील – विजयी
कुणाल पाटील यांनी धुळ्यातून लोकसभा निवडणूक लढली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला.
भाऊसाहेब कांबळे –पराभव
मूळचे शिवसेनेचे असलेले भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढले होते. मग ते पुन्हा शिवेसेनेत आले. सेनेकडून ते श्रीरामपूरमधून लढले. मात्र लोकसभेनंतर त्यांचा विधानसभेतही पराभव झाला.
के सी पाडवी – विजयी
काँग्रेसचे के सी पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनीही नंदुरबारमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.
गोपीचंद पडळकर : पुन्हा पराभूत
गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीकडून सांगलीतून लोकसभा निवडणूक लढले होते. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र बारामतीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
हर्षवर्धन जाधव : पुन्हा पराभूत
मूळचे शिवसेनेचे असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीतही ते रिंगणात उतरले होते. मात्र इथेही त्यांना विजय मिळवता आला नाही.