MP Assembly Election 2023 : मुख्यमंत्री यांच्यासमोर उमेदवार भावूक, अश्रू झाले अनावर, असं नेमक काय घडलं?
पहिला हक्क हा गरिबांचा आहे असे पंतप्रधान मोदी म्हणतात. भारताच्या सीमा आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. जो देशाकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याचे डोळे बाहेर काढायला वेळ लागणार नाही. आता देशात कर्फ्यू नाही.
उत्तर प्रदेश | 15 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कॉंग्रेसही या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले आहेत. तर, कॉंग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अन्य नेते विविध राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. मध्यप्रदेशमध्येही विधानसभा निवडणूक होत आहोत. येथे भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान विरुद्ध कॉंग्रेसचे कमलनाथ असा थेट सामना रंगणार आहे.
मध्यप्रदेशमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले. पन्ना मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
काँग्रेस नेहमी जातीच्या नावावर राजकारण करते अशी टीका त्यांनी केली. देशावर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे काँग्रेसवाले म्हणायचे. पण, पहिला हक्क हा गरिबांचा आहे असे पंतप्रधान मोदी म्हणतात. भारताच्या सीमा आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. जो देशाकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याचे डोळे बाहेर काढायला वेळ लागणार नाही. आता देशात कर्फ्यू नाही असे त्यांनी सांगितले.
भाजपचे डबल इंजिन सरकार मध्यप्रदेशातील गरिबांसाठी काम करत आहे, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी या सभेत जनतेकडून मते मागितली. काँग्रेसच्या काळात मध्यप्रदेश हे आजारी राज्य होते. पण, डबल इंजिन सरकारने विकसित राज्य निर्माण केले आहे असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
पन्ना येथे येणे हे माझे भाग्य आहे. भाजपच्या राजवटीत येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सिमेंट कारखाने उभारले जात आहेत. आता हिरेही मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागले आहेत. हिरे उद्योगातून रोजगार निर्मिती होईल. देशातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात काँग्रेसची सरकारे अपयशी ठरली अशी टीका त्यांनी केली.
योगी आदित्यनाथ यांचे हे भाषण सुरु असतानाच अचानक उमेदवार प्रल्हाद लोधी भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. मंचावर उपस्थित नेत्यांनी त्यांना आधार दिला. आदित्यनाथ यांना ऐकण्यासाठी या सभेला मोठी गर्दी झाली होती. याच सभेत भाजप कार्यकर्ता अमित खरे हे योगी यांच्यासारखाच वेश परिधान करून आले होते. त्यांचा हा वेश उपस्थित लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला होता.