कोल्हापुरात ‘कडकनाथ’वरुन सदाभाऊ आणि राजू शेट्टी आमनेसामने
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचं बोललं जातंय.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot and Raju Shetty) पुन्हा आमनेसामने आलेत. कडकनाथ कोंबडी त्यासाठी यावेळी निमित्त ठरली आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot and Raju Shetty) यांच्या नातेवाईकांची असल्याचं बोललं जातंय. यावरूनच आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगला असून हा वाद आता एकमेकांच्या खाण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करण्यासाठी राज्यभरातील शेतकरी बेरोजगार तरुणांकडून लाख रुपये घेतले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच कंपनीने आपली प्रमुख कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. कंपनीकडून राज्यभरात पाचशे कोटीहून अधिक फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे या कंपनीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राजू शेट्टी यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी कोल्हापूरची पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवल्याने या गैरव्यवहाराला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. यावरूनच बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत यांचा कोंबडी चोर असा उल्लेख केला होता. याला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी महारयत अॅग्रोचे प्रमुख आपले नातेवाईक असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान दिलंय. यावरच ते थांबले नाही, तर राजू शेट्टी यांना चिकन आवडते असे सांगतानाच, तसे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला. शेट्टी हे अक्कलशून्य असल्याची बोचरी टीका करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही ते म्हणाले.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप करण्याचे आयते कोलीत माजी खासदार शेट्टी यांना मिळालंय. सदाभाऊ खोतही त्याला त्यांच्याच स्टाईलने प्रत्युत्तर देत आहेत. कडकनाथ कोंबडीवरून सुरू झालेले हे वाकयुद्ध दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात असल्याचं चित्र आहे.
महारयत अॅग्रोचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा आरोप झाल्यानंतर हे आरोप सिद्ध करण्याचं आव्हान खोत यांनी दिलं. त्याला स्वाभिमानी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं. संबंधित नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका स्वाभिमानीकडून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली, ज्यात सदाभाऊ खोत यांच्या नावाचा उल्लेख आहे.