केंद्राची महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट मदत; बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये: फडणवीस
मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत | Devendra Fadnavis Mahavikas Aghadi

मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi)
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख 35 हजार रेमडेसीविर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच 1100 व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकासआघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘लसीकरणाविषयी महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही’
सर्व नागरिकांना लस मोफत देणार, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केली आहे. यासंदर्भात महाविकासआघाडी मध्ये एकवाक्यता असली पाहिजे. मात्र, एखाद्या राज्याला वाटले की त्यांना मोठ्या संख्येने लसीकरण करायचे आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे. खासगी आस्थापनांना वाटलं स्वतःचा पैसा खर्च करून लसीकरण करायचे आहे तर ते करू शकतात.
मात्र, आता महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत? आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. 1 तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.
‘महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही’
कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
मुंबईला दीड लाख कोरोना लसींचा साठा मिळाला, पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा
“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ समजून घेतली असती, तर गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती”
टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले
(Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi)