उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊतांकडून घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार (Uddhav thackeray ayodhya) आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार (Uddhav thackeray ayodhya) आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट संजय राऊत (Uddhav thackeray ayodhya)यांनी केलं.
राज्यात आता ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता 55 दिवस झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020
यापूर्वीचा दाैरा
उद्धव ठाकरे हे नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 24 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे श्रीरामाच्या दर्शनाला अयोध्येत गेले होते. त्यावेळी ते सोबत शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येत घेऊन गेले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत शिवसेनेने उद्धव ठाकरेंचा हा दौरा आखला होता.
यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी पुन्हा 24 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्र निवडणुकीची धामधूम, सत्तास्थापनेचं नाट्य या सर्व घडामोडीमुळे हा दौरा रखडला. तो आता पुन्हा आखण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली!
ठाकरे सरकारचा पहिला ‘महाविस्तार’, 26 कॅबिनेट, दहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी