मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांसोबत कॉफी पिऊन आले… चंद्रकांत खैरेंचा आरोप काय?
भाषिक मुद्द्यावर दोन राज्यांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप खैरेंनी केलाय.
औरंगाबादः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. मात्र या बैठकीत नेमकं काय झालं? हे बाहेर आलेलं नाही. त्यामुळे शिंदे तिथे फक्त कॉफी पिऊन बाहेर आले, असा खोचक टोला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. औरंगाबादेत टीव्ही९ शी बोवताना खैरे यांनी शिंदे सरकारवर आरोप केले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता बेळगावात जायचं ठरवलं आहे. मात्र कर्नाटक सरकारकडून नेते आणि कार्यकर्त्यांची अडवणूक सुरु आहे. कर्नाटकने आम्हाला अडवण्याचं काम नाही, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
महाष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आह. केंद्रातदेखील भाजप सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज होती. मात्र शिंदे आणि फडणवीस यांनी या भेटीत काय घडलं ते बाहेर येऊच दिलं नाही. मग हे धडाडीचे मुख्यमंत्री फक्त कॉफी पिऊन निघून गेले का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.
बेळगाव-कारवार निपाणी बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी आमची मागणी होती. पण आता सोलापूर आणि सांगलीतल्या गावांवरही त्यांनी दावा कर्नाटकने सांगितलाय. हा वाद मुद्दाम उकरून काढला जातोय.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकार भाजपचं सरकार असताना हा मुद्दा वाढवला जातोय. तिघांच्या बैठका झाल्या, पण त्यात काही बाहेर आलं नाही, त्यामुळे तिथे काहीतरी घडलं असेल, अशी शंका खैरे यांनी व्यक्त केली आहे.
भाषिक मुद्द्यावर दोन राज्यांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप खैरेंनी केलाय. महाविकास आघाडीचा मोर्चा नॅनो असल्याची टीका केली जातेय. हे वक्तव्य खैरेंनी फेटाळलं.
मुंबईच नव्हे तर दिल्लीतल्या पत्रकारांनीही मला या विराट महामोर्चाबद्दल प्रतिक्रिया दिल्याचं खैरे म्हणाले.