‘रमेश बोरनारेंनी पैसे देऊ माणसं सोडली, गोंधळ घातला’, चंद्रकांत खैरे आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक प्रकरण पेटलं
वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच लोकांना पैसे देऊन या कार्यक्रमात सोडलं, त्यांनीच गोंधळ घातला, असा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.
दत्ता कनवटे, औरंगाबादः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या ताफ्यावर काल औरंगाबादमधील (Aurangabad) वैजापूर येथे झालेली दगडफेक (Stone Pelting) अत्यंत गंभीर होती. यामागे नेमका कुणाचा हात होता, यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काल केवळ रमेश बोरनारे यांच्या कार्यकर्त्यांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं होतं. आता चंद्रकांत खैरे यांनी थेट बोरनारे यांच्यावर आरोप केले आहेत. वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच लोकांना पैसे देऊन या कार्यक्रमात सोडलं, त्यांनीच गोंधळ घातला, असा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.
काय म्हणाले खैरे?
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश बोरनारे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ राज्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी शिवशक्ती-भीमशक्ती युती झाल्याने युतीत भांडणं लावून देण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र तसं काहीही नाही. येथील गद्दार आमदारांनी हा प्रकार घडवून आणला आहे. वैजापुरात रमाईंची मिरवणूक होती. बोरनारे यांनी मुद्दाम तिथे काही लोकांना घुसवलं, त्यांना दारू पाजली. मग त्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.. असं वक्तव्य खैरे यांनी केलंय.
काय घडलं नेमकं?
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रेदरम्यान काल औरंगाबादमध्ये शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला होता. वैजापूर तालुक्यातील महालतगावात शिवसेनेचा कार्यक्रम होता. याच वेळी रमाईंची मिरवणूक निघाली. त्यामुळे गर्दीत गोंधळ झाला. स्टेजवर बोलताना आदित्य ठाकरे यांच्या दिशेने एक दगड आला. त्यानंतर आदित्य ठाकरे तेथून निघाल्यानंतरही ताफ्यावर दगडफेक झाली. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हा हल्ला झाल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येतोय.
अंबादास दानवेंचं महासंचालकांना पत्र
औरंगाबादचे शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या हल्ल्यावरून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले आहे. आदित्य ठाकरेंसारख्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांच्या गाफीलपणामुळे अशा प्रकारची घटना घडली, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
तर आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक करण्याएवढी हिंमत रमेश बोरनारेंमध्ये नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. त्यांना मानणाऱ्या काही लोकांचं हे कृत्य असल्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सध्या सुरु आहे. त्यानिमिमत्त मराठवाडा दौऱ्यावर असताना काल ते औरंगाबादेत होते.