हा नंतर आला..येऊन काड्या… चंद्रकांत खैरे संतापले, दानवेंची तक्रार आता थेट ठाकरेंकडे करणार, म्हणाले…
संभाजीनगरचे माजी खासदार तथा ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते तथा ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानव एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत.

Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात येथे नाराजीनाट्य रंगले आहे. संभाजीनगरचे माजी खासदार तथा ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते तथा ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानव एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्याबाबत मला काहीही सांगितलेले नाही. मला दानवे यांनी बोलावलेले नाही, असा दावा खैरे यांनी केलाय. तर दुसरीकडे मी कार्यक्रम पत्रिकेत मार्गदर्शक म्हणूनच नाव टाकले होते, असा दावा दानवे यांनी केलाय. त्यानंतर आता मी दानवे यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार आहे, असं खैरेंनी म्हटलंय
चार महिन्यांत त्यांच पद जाणार- खैरे
“मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो. मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादास हा स्वत:ला मोठा समजतो. आता फक्त चार महिने तो विरोधी पक्षनेता राहणार आहे. त्यानंतर त्यांचं पद जाणार आहे,” अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली.
दानवे काड्या करण्याचं काम करतात- खैरे
मी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंबादास दानवे यांची तक्रार करणार आहे. आमची परवा बैठक आहे. या बैठकीत मी सगळं सांगणार आहे. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का? अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत. नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत. मला हे बिलकूल आवडत नाही,” असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या समाजाचा एक मेळावा होता. या मेळाव्याला ते गेले होते. ते मागच्या काळात माझ्याविषयी काही-काही बोलले. मी त्याला उत्तर दिलेलं नाही. आताही मी काहीही उत्तर देणार नाही. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला दांडी मारली की नाही हे त्यांनाच विचारा. मला काहीही विचारू नका,” असं स्पष्टीकरण दानवे यांनी दिलंय. तसेच, मी मेळाव्याच्या कार्यक्रमाला खैरे यांचेच नाव मार्गदर्शक म्हणून टाकले होते, ते आले नाहीत. मग मी काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.