50 च्या 50 पडतील, हा शाप आहे, नाही तर मी हिमालयात जाईन… नवरात्रोत्सवात कुणाचं वक्तव्य?
हे पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर माझं नाव बदलून ठेवा. मी हिमालयात जाइन. हा शाप आहे. आई जगदंबेचा. कारण गद्दारी जनतेला आवडत नाही, असा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिलाय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) जीवावर तुम्ही मोठे झालात. त्यांच्या मुलाविरोधात कारस्थानं करत आहात. तुम्ही पन्नासच्या पन्नास पडणार. जनता माफ करत नाही. हे लोक नाही पडले तर माझं नाव बदलून ठेवा. मी हिमालयात जाईन मग. हा शाप आहे आई जगदंबेचा. कारण जनतेला गद्दारी आवडत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलंय. औरंगाबादमध्ये त्यांनी tv9 शी संवाद साधला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्याला कोट्यवधी रुपये खर्च करून गर्दी जमवली जातेय, असा दावा त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचं एक चॅटिंग आपल्या हाती लागल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. त्यात राज्यातील 36 जिल्ह्यांत 52 खोके वाटून शिंदे गट गर्दी करणार असल्याचं स्पष्ट होतंय, असा आरोप खैरेंनी केलाय.
प्रतिक्रिया देताना खैरेंनी या सगळा हिशोब मांडला. ते म्हणाले, एका गाडीत 52 सीट असतात. जेवणाचा खर्च 500 रुपये प्रमाणे 26 हजार रुपये होतो एका गाडीचा. त्यानंतर गाडी भाडे जवळपास 45 हजार रुपये. इतर खर्च 15 हजार रुपये. यात चहा पाण्याच्या बाटल्या वगैरे. असे 86 हजार रुपये खर्च एका गाडीसाठी…
पहा खैरेंचे आरोप-
सरासरी एका तालुक्यासाठी 15 बसेस पकडल्या तरी 12 लाख 9 हजार असा खर्च. जिल्ह्यांचा खर्च 1 कोटी 29 लाख असा होतोय. काल मी 1 कोटी म्हटलो होतो. 44 जिल्ह्याचा एकूण खर्च पाहिला तर 52 कोटी रुपये होतात, असा अंदाज आहे, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय.
यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुठून आणले पैसे? उद्धव साहेबांना छेडण्यासाठी, बाळासाहेबांच्या सुपुत्राला त्रास देण्यासाठी हे पैसे वापरायला सुरुवात केली, असं खैरे म्हणाले.
ज्या बाळासाहेबांनी यांना खाते दिले. महत्त्वाचे खाते दिले. ते उलटले. जनता माफ करत नाही. ज्यानी मोठं केलं त्याला विसरायचं नसतं… असंही खैरे म्हणाले.
म्हणून हे पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर माझं नाव बदलून ठेवा. मी हिमालयात जाइन. हा शाप आहे. आई जगदंबेचा. कारण गद्दारी जनतेला आवडत नाही, असा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिलाय.