चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचं कौतुक, तर्कवितर्कांना उधाण
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil appreciate Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.
सोलापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil appreciate Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. राज्यात महापुरानं आणि त्यानंतर अवकाळी पावसानं शेतकर्यांचं नुकसान झालं आहे हे सांगताना त्यांनी शरद पवार शेतकऱ्यांचं दु:ख जाणणारे चांगले नेते असल्याचं म्हटलं. निकालाच्या आधी शरद पवारांना लक्ष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil appreciate Sharad Pawar) आपला सूर बदलला आहे. त्यांनी पवारांचं कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. हा राष्ट्रवादीशी सलगी करण्याचा तर प्रयत्न नाही ना अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटील कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी आज (7 नोव्हेंबर) संध्याकाळी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीनंतर जनादेश दिला आहे. असं असतानाही सरकार स्थापन होत नाही याचं दुःख आहे. मात्र, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर देखील टीका केली जाते, याचे दुःख भाजपला आहे.” यातून पाटील यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवरील आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही’
कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे नेते आमच्यासोबत आले आहेत ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून आले. भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
‘या गोष्टीचं दुःख’
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने जनादेश देऊनही अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नाही याचं दुःख असल्याची भावनाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात राष्ट्रपती शासन येणार असल्याचं बोललं जात आहे.
निसर्गाचं बदललेलं चक्र पुर्ववत व्हावं आणि संकटामागून येणाऱ्या संकटातून बळीराजा आणि राज्यातील जनतेला सावरण्याची शक्ती दे असं साकडं महापूजेनंतर विठ्ठलाला घालणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या दृष्टीकोनातून राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर बोलणं टाळलं. शिवसेनेची भूमिका कायम असताना उद्या (8 नोव्हेंबर) शपथविधी होणार का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत सरकार अस्तित्वात न आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? असाच संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचं बोललं जात आहे.