युतीचा कुठलाही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही: चंद्रकांत पाटील
भाजप-शिवसेना युतीचा (BJP Shivsena Alliance) पेच अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. दोन्हीकडून युती होणारच हा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्यापही विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) जागावाटपावरुन युतीचं घोडं अडलं आहे.
मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा (BJP Shivsena Alliance) पेच अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. दोन्हीकडून युती होणारच हा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्यापही विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) जागावाटपावरुन युतीचं घोडं अडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेच्यावेळी झालेल्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप होईल, असं म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी युतीचा अद्याप कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं म्हटलं.
भाजप-शिवसेनेतील अंतिम फॉर्म्युला ठरला की लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं आहे. अमित शाह संबंधित पत्रकार परिषदेला हजर राहणार की नाही याबाबत मात्र, अद्याप स्पष्टता नाही.
युतीची घोषणा कधी होणार?
युतीची घोषणा कधी होणार याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीची घोषणा कधी होणार याचं उत्तर देण्यासाठी ‘लवकरात लवकर’ हाच शब्द योग्य ठरेल. अनिल देसाई काय बोललात हे मी ऐकलं नाही. त्यांच्याशी बोलून घेतो.” नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत शिवसेनेला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
दुसरीकडे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला (BJP Shiv Sena formula) आधीच ठरल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, फॉर्म्युलाही (BJP Shiv Sena formula) ठरला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
‘मुख्यमंत्री उमेदवारांची यादी तयार करून देतील’
लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा फॉर्म्युला ठरला आहे. यावेळी मी वेगळी पद्धत अवलंबली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाही टोला लगावला. मुख्यमंत्री आमच्या उमेदवारांची यादी तयार करून देतील. ती आमच्या नेत्यांशी चर्चा करून युती जाहीर होईल, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
युतीत कोणाताही तणाव नाही. लवकरच युतीची घोषणा होईल. लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं.
लोकसभेवेळी कोणता फॉर्म्युला ठरला होता?
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यावेळी लोकसभेला शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
त्यावेळी शिवसेनेची दुसरी अट होती ती म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जातील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल, त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या यांचंही समान वाटप होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
भाजपचा नवा प्रस्ताव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांची जागावाटपावर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार शिवसेना 126 तर भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ठरलेला हा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह 22 सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. त्यावेळी या जागावाटपांचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
‘वर्षा’वर फॉर्म्युला जवळपास निश्चित, भाजप आणि मित्रपक्षांना 162 जागा, शिवसेनेला किती?