जनसंपर्कासाठी खासगी संस्थेला 6 कोटी रुपये, उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनसंपर्कासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या टेंडरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Chandrakant Patil on PR expense of Uddhav Thackeray Government).
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनसंपर्कासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या टेंडरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Chandrakant Patil on PR expense of Uddhav Thackeray Government). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात सरकारविषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एका खासगी कंपनीला 6 कोटी रुपयांचं टेंडर दिलं, असा आरोप त्यांनी केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने एका खासगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे 6 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटते की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे ही सरळ सरळ जनतेची दिशाभूल करुन त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करण्याचा प्रकार आहे.”
“जनसंपर्कासाठी खर्च केलेल्या 6 कोटी रुपयांमध्ये 25 ते 30 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या. हा विचार राज्य सरकारने करायला हवा होता. उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी काळजी घ्या,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, भाजपकडून ठाकरे सरकारवर सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. राज्यातले काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते, असा नवा शोध वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. तसेच या अधिकाऱ्यांनी असं केलं असेल तर गृहमंत्री म्हणून सरकारने काय कारवाई केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अतुल भातखळकर म्हणाले, “वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते असा नवीनच शोध लावलाय. यामुळे पहिला प्रश्न हाच आहे की या आयपीएस अधिकाऱ्यांवर गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी काय कारवाई केली? याची माहिती त्यांनी जनतेपासून इतके दिवस का लपवून ठेवली?”
“वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सुशांतप्रकरणावरुन मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. “या गृहमंत्र्यांच्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालीयन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दोन महिने होऊनही एक इंचही पुढे सरकता आलं नाही त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? त्यामुळे या अधिकाऱ्यांनी असं काही केलं असेल तर त्यांच्यावर जरुर कारवाई करावीच, पण या वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबोडतोब राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे,” असंही मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :
मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
कंगना रनौतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला?, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अजितदादा, तुमचा धाक आठवड्यात एकदाच नको, रोज पुण्यात या, चंद्रकांत पाटलांचे आवताण
Chandrakant Patil on PR expense of Uddhav Thackeray Government