पवारांनी स्वप्न पाहू नये, ही विधानसभा निवडणूकही भाजपच जिंकणार : चंद्रकांत पाटील
महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बारामती : महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या विधानसभा निवडणुकीतही सत्ता भाजपकडेच (BJP) राहिल, असा दावा केला आहे. सरकार भाजपचंच येणार आहे हे शरद पवारांना (Sharad Pawar) सांगा. ते अजूनही विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत आहेत, असाही टोला पाटील यांनी पवारांना लगावला. ते बारामतीत (Baramati) भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभेतील पराभवाने नाउमेद न होता 2024 ची निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांनाही आपलं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर हे पवारांनाही सांगा. पवारांना आजही विधानसभेत सत्ता येईल असंच वाटत आहे, असा टोला पवारांना लगावला.
‘लोकसभेच्या निकालाची पवारांना धास्ती होती’
लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत शरद पवार यांना बारामतीच्या निकालाची शाश्वती नव्हती. निकालात काही गडबड होते का अशीच शंका त्यांना होती. इतकी निकराची लढाई भाजपनं या मतदारसंघात केल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं. लोकसभेच्या निकालानं नाउमेद न होता कुठे कमी पडलो, आता पुढे काय करायचे याचा विचार करून 2024 च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
बारामतीतील भाजप इनकमिंगवरही भाष्य
भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मंचावर अनेकजण उपस्थित होते. त्याचा आधार घेत चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतील भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगवरही भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “इथं बसायला जागा नाही ही आनंदाची बाब आहे. इथं लोक बिनधास्तपणे बसत आहेत. आपण नेतृत्व करू असं म्हणत आहेत. त्यामुळं आपण मोजक्याच लोकांची नावं घेणार आहोत.
‘बारामतीची जागा कुणालाही मिळो, आपण ताकदीनं लढणार’
चंद्रकांत पाटील म्हणाले, “बारामतीची जागा कोणाला द्यायची याबाबत खलबतं सुरू आहेत. मात्र, ही जागा कुणालाही मिळाली, तरी येथे प्रचंड ताकदीनं निवडणूक लढवू.”